कुमार आजारी पडण्यापूर्वी मैफलीच्या वेळी आपली तंबोऱ्याची जोडी पंचम व निषादमध्ये मिळवित असत हे मला माहित आहे. किराणा घराणे हे सर्व घराण्यात अत्यंत सुरेल मानले जाते व त्या घराण्यातील सर्व गायक आपले तंबोरे पंचम व निषादामध्ये मिळवतात ह्या गोष्टीचे कुमारांनी त्या वेळेस अनुकरण केलेले असावे. मी त्या काळी सर्व मैफलींत कुमारांची हार्मोनिअमची साथ करीत असे व त्या वेळी मला अगदी जवळून ह्या गोष्टी लक्षात ठेवता आल्या. कुमार आजारी पडल्यानंतर त्यांनी जे चिंतन केले व काही गोष्टींचा निर्णय घेतला त्यात तंबोऱ्याची जोडी पंचममध्येच मिळवणे योग्य होय हाही निर्णय घेतला असावा. त्यांचे याबद्दलचे समर्थन अगदी शास्त्रशुद्ध आहे. पंचम स्वर हा अचल आहे पण निषाद हा चल असल्यामुळे दर मैफलीत तो वेगवेगळ्या उंचीचा निश्चित लागणार आणि त्यामुळे ते तंबोरे कानाला जरी मोहक वाटत असले तरी शास्त्रशुद्ध नव्हेत. प्रत्येक रागातील निषादाचा लगाव हा एकाच उंचीचा नसतो. तसा दोष पंचमच्या तंबोऱ्यात मुळीच नसतो. तो पंचम स्थिरच असतो.
{टीप : दोन तंबोरे पंचमात मिळवल्यानंतर त्यातून जसा एक प्रकारचा ड्रोन (Drone – एकसारखा आवाजाचा होणारा स्तंभ) तयार होतो तसा पंचम-निषादाच्या तंबोऱ्यात होत नाही ही एक प्रत्यक्ष अनुभवायची गोष्ट आहे. त्याचा प्रत्यय पाहायचा असेल तर रेडिओ सुरु होण्यापूर्वी जो सिग्नल ऐकू येतो त्याला पार्श्वभूमी म्हणून पंचमाचे दोन तंबोरे एकसारखे वाजवलेले ऐकू येतात. ते काळजीपूर्वक ऐकावे म्हणजे ड्रोन तयार होणे म्हणजे काय हे बरोबर कळते. मी कित्येकदा रेडिओ ऐकण्यापेक्षा हा ड्रोन ऐकण्याकडे जास्त लक्ष देत असे व सिग्नल ऐकल्यानंतर रेडिओ बंद करीत असे. पाकिस्तानच्या रेडिओ सिग्नलमध्ये तर वाद्यावर सा आणि प हेच स्वर तीनदा वाजवून सिग्नल पुरा केलेला ऐकण्यात येतो. त्या ठिकाणी सा-नी हे स्वर वाजवून ड्रोन तयार होत नाही. पंचमाच्या महत्वाचे हे रसग्रहण पाकिस्तानने जास्त केले आहे हे खास. वास्तविक पाहिले असता षड्जात सर्व स्वरांचाच अंतर्भाव झालेला असतो. पण त्यातील अंतर्भूत असलेला पंचम हा ४ श्रुतींचा असल्यामुळे तो सर्वात जास्त स्पष्ट ऐकू येतो. अशा रीतीने तंबोऱ्याच्या सर्व तारांमधून षड्जाच्या अंतर्गत असलेला पंचम सुस्पष्ट व एकसारखा ऐकू येत असल्यामुळे त्याचाही एक स्वतंत्र स्वरप्रवाह तयार होतो. त्यामुळेच पंचमाच्या दोन्ही तंबोऱ्यांमधील तयार होणारा ड्रोन जास्त प्रवाही व प्रभावी होतो असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. षड्जात असणारा निषाद हा व्दिश्रुतिक म्हणून पंचमाच्या मानाने कितीतरी दूरान्वयाने ऐकू येतो. फक्त षड्जाला मिळताना निषादाच्या साहाय्याने मिळणे सोपे जाते म्हणून काही लोकांनी सोयीसाठी त्याचा वापर केला असावा.}
म्हणून मारव्यासारखे रागही कुमार पंचमच्या तंबोऱ्यामध्येच गातात. निषादाच्या तंबोऱ्यामुळे उन्मादक वातावरण जरूर होते व काही रागांना ते पोषकही ठरते. पण त्याच्या आहारी कुमार कधीही जात नाहीत. पंचमाच्या तंबोऱ्यामुळे कुमारांचा मारवा रंगला नाही असे कधीच झाले नाही.
कुमार पूर्वीसारखे पंचम-निषादचे तंबोरे लावीत नाहीत हे लक्षात आल्यावर मी एकदा त्यांना विचारले, ‘पूर्वीसारखे पंचम-निषाद हल्ली तंबोऱ्यात का नसतात?’ त्यावर त्यांनी ताड्कन उत्तर दिले, ‘त्यावेळी मला कळत नव्हते. आता कळू लागले आहे. मी पंचममध्येच दोन्ही तंबोरे लावणार.’ ‘कुमारांचे तंबोरे’ हा विषय एखाद्या प्रबंधाला पुरेल एवढा आहे. तंबोरे लावण्यामागील ही शास्त्रशुद्ध भूमिका किती लोकांनी विचारात घेतली आहे?
‘तंबोरे’ हा कुमारांच्या मते एक संशोधनाचा विषय आहे. तंबोऱ्याच्या बनावटीपासून तंबोऱ्याच्या मिलावटीपर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी चिकित्सक बुद्धीने अभ्यास केला आहे. तंबोऱ्याच्या बाबतीतील त्यांची प्रयोगशीलता ही आजारानंतर जास्त सुरू झाली. आजारामध्येच हे चिंतन झाले असावे असा माझा तर्क आहे. पूर्वी कात्रे यांच्या क्लासमध्ये जेव्हा कुमारांचे कार्यक्रम आम्ही करीत असू त्यावेळी आम्ही कुठलेही तंबोरे आणीत असू. त्यातल्या त्यात श्री. डी. व्ही. पलुस्कर यांचे तंबोरे कुमार पसंत करीत. आजारानंतर मात्र त्यांनी तंबोऱ्याच्या बाबतीत आपली चिकित्सा वाढवली. पहिली जोडी त्यांनी आणली ती तूनच्या लाकडाची होती. ती फारच चांगली वाजे. म्हणून मीही त्यांच्याच पसंतीने तूनच्या लाकडाची तंबोरे जोडी तयार करून घेतली व तीच अजून मी वापरतो आहे. पण कुमारांच्या मते ब्रह्मी सागवान हे लाकूड तंबोऱ्याला जास्त चांगले आहे. असे ब्रह्मी सागाचे लाकूड पैदा करून ते सीझन्ड करून (अनेक दिवस वाळवल्यावर) त्याचे तंबोरे त्यांनी वापरायला सुरुवात केली. गाण्यासाठी प्रवास करताना वाटेत मिरज स्टेशन लागले की तेथे उतरुन त्यांच्या ठराविक तंबोरे बनवणाऱ्याकडे एक तंबोरे जोडीची ऑर्डर ते देत आले आहेत. त्याच्या किमतीबद्दल कधी त्यांनी चिकित्सा केली नाही. मागेल ती किंमत त्यांनी आतापर्यंत दिली आहे.
अशा रितीने माझ्या समजुतीप्रमाणे त्यांच्या संग्रही ५-६ तंबोरे जोड्या तयार केलेल्या आहेत. कुमारांचा स्वर पांढरी ४ म्हणजे बराच उंचीचा असल्यामुळे त्यांच्या तंबोऱ्यावर ढाल्या स्वराच्या गायकांना गाता येत नाही म्हणून ही उणीव दूर करण्यासाठी त्यांच्या घरी देवासला ढाल्या स्वराची तंबोरे जोडी करून ठेवली आहे. बी. डी. वाडीकर, कृष्णराव मुजुमदार इत्यादी ढाल्या स्वरात गाणाऱ्या गायकांचीही कुमारांच्या घरी त्यामुळे गैरसोय होत नाही. स्त्रियांच्या आवाजासाठी म्हणून काळी ४ चीही जोडी त्यांच्या संग्रहात आहे. कुमारांचा महिन्यातून एखादा तरी कार्यक्रम मुंबईला असतो व दर वेळी तंबोरे आणणे त्रासदायक असल्यामुळे एक तंबोरे जोडी मुंबईला कायम ठेवलेली असते. शिवाय वेळ वाचवण्याच्या दृष्टीने हल्ली कुमार विमानानेच मुंबईला येतात. त्यामुळे त्यांनी ही सोय मुद्दाम करून ठेवली आहे. आपल्या सवयीचे तंबोरे असल्याशिवाय हल्ली कुमार मैफलीत गात नाहीत.
तंबोऱ्यांची जपणूक हा एक कुमारांचा आस्थेचा विषय आहे. त्यांनी सर्व तंबोऱ्यांच्या गवसण्या रजईसारख्या उबदार करून घेतलेल्या आहेत. त्यात कुठेही काटकसर नाही. तंबोऱ्यांचे पॉलिश सुद्धा नेहमी नुकतेच तयार करून आणल्यासारखे असते. दररोज तंबोरे पुसणे हा त्यांच्या दिनचर्येतला एक भाग असतो. विद्यार्थ्यांना प्रथम तंबोरे मिळवण्याचे शिक्षण देण्याकडे त्यांचा कटाक्ष आहे. तंबोरे वाजवण्यातही एक प्रकारची शिस्त त्यांनी घालून दिलेली आहे. निरनिराळ्या पट्टीतले तंबोरे छेडण्यातील लय सुद्धा त्यांच्या मते वेगळी आहे. काळी चारचे व पांढरी चारचे तंबोरे वेगवेगळ्या लयीत वाजवले पाहिजेत असे त्यांचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे त्यांच्या मैफलीत आयत्या वेळी कोणालाही धरून तंबोरे वाजवायला बसवणे ही गोष्ट शक्य नाही. त्यासाठी अगोदर त्यांच्या देखरेखीखाली तंबोरे वाजवण्याच्या सूचना मिळाल्यानंतरच तंबोऱ्यासाठी मागे बसवले जाते.
तंबोऱ्यांची जव्हारी बरोबर आहे की नाही ही गोष्ट कुमार सातत्याने पाहत असतात. एखाद्या तारेची जव्हारी बरोबर नसेल तर जाणकाराला बोलवून मैफलीच्या वेळीही ते जव्हारी नीट काढून घेतात. तंबोऱ्याची तार ऐनवेळी तुटल्यास, घोटाळा होऊ नये यासाठी चारही तारांचे सेट त्यांच्या पिशवीत नेहमी असतात. त्या तारा कोणत्या नंबरच्या व कोणत्या प्रकारच्या असाव्या ह्याचेही अंदाज त्यांनी बांधलेले आहेत. मैफलीच्या आधी निदान अर्धा तास तरी तंबोरे जुळवून ते वाजवले गेले पाहिजेत या गोष्टीवर त्यांचा कटाक्ष असतो. तंबोरे जुळवून माईकवर ते कसे ऐकू येतात हे पाहण्यासाठी ‘बालगंधर्व थिएटर’ मधील निरनिराळ्या कोपऱ्यात जाऊन त्यांनी पाहिल्याचे मला आठवते.
तंबोऱ्याच्या तारांची जव्हारी खुली बोलण्यासाठी जे सूत वापरावे लागते ते कसे असावे याबद्दलचे त्यांचे निरनिराळे प्रयोग पाहून तर मी थक्क झालो. अगदी पूर्वी तर सूत उलगडून त्याचे धागे पाहिजे तेवढ्या जाडीचे घेण्याचा प्रयोग मी पाहिला. ते निरनिराळ्या सुतांचा प्रयोग करीत असत. कुठेही जव्हारीला योग्य असे सूत दिसले की त्याचा संग्रह करण्याचा त्यांना छंद होता.
एकदा तर त्यांनी मला सांगितले की, ‘‘माझ्या अंगातील गंजीफ्रॉकचा एक बाहेर आलेला धागा मला चांगला वाटला म्हणून मी लावून पाहिला व त्यामुळे तो तंबोरा चांगला लागलेला पाहिल्यावर गंजीफ्रॉकचे धागे वरचेवर काढून मी गंजीफ्रॉकच खलास केला.’’ त्यांच्या पिशवीत या सुतांच्या संग्रहासाठी एक पेटीच असते. त्यात काही निरनिराळ्या नंबरांची रेशमी रिळे असतील, काही सुती धागे असतील तर काही खर्जाच्या तारेसाठी स्वतंत्र धागेही असतील. निरनिराळ्या ऋतूंमध्ये व निरनिराळ्या ठिकाणी तेथील हवामानाप्रमाणे निरनिराळ्या सुताचा उपयोग कुमार करतात. रात्रंदिवस तंबोरे मिळवण्याच्या दृष्टीने त्यांची नजर निरनिराळ्या धाग्यांवर भिरभिरत असे. मीही हे सगळे पाहून तसा छंद लावून घेतला व मला तंबोरे मिळवण्यातील आनंद मिळू लागला. कुमारांचे दोन तंबोरे सुरात मिळाले म्हणजे सुरांचा एक अखंड प्रवाह ऐकू येतो. नुसते तंबोरे मिळवून ऐकणे यात कुमारांना खूप आनंद असतो. देवासला मुक्काम असला म्हणजे रात्री जेवण झाल्यावर तंबोरे लावून ते ऐकत बसणे हा एक कुमारांचा आवडता छंद आहे. स्वतःच्या तंबोऱ्याचे त्यांनी अर्ध्या तासाचे टेप करून घेतले आहे व पाहिजे त्या वेळी ते टेप ऐकत बसतात. तंबोऱ्याची मिलावट म्हणजे मैफलीचे चित्र ज्याच्यावर काढायचे ते कॅनव्हास आहे असे जे कुमार म्हणतात ते अगदी योग्य आहे.
मैफलीमध्ये तंबोरे मनासारखे लागल्याशिवाय कुमार कधीही गायला सुरुवात करीत नाहीत.
तंबोरे मिळवण्याच्या ह्या चिकित्सेमध्ये स्टेजवरही त्यांचा पुष्कळ वेळ जातो व त्यामुळे सामान्य श्रोते नाराजही झालेले असतात पण तिकडे कुमार दुर्लक्ष करतात. सभागृहातील गडबडीमुळे तंबोरे जुळवायला त्रास पडतो तेव्हा कुमार माईक वरून श्रोत्यांना ‘शांत राहा’ म्हणून विनंती करतात. एकदा असाच स्टेजवर तंबोरे जुळवायला कुमारांना वेळ लागला. तेव्हा एक जाणकार श्रोता मजजवळ म्हणाला, ‘‘दुसऱ्या खोलीत तंबोरे जुळवून का आणीत नाहीत. निष्कारण लोकांचा वेळ यात जातो.’’ श्रोत्यांची ही तक्रार कुमारांच्या कानावर घातली त्यावर कुमार म्हणाले, ‘‘तंबोरे मिळवण्यात काय आनंद असतो हे तरी श्रोत्यांना केव्हा कळणार. रेडिमेड लावलेले तंबोरे स्टेजवर आणून एकदम गायला सुरुवात करण्यापेक्षा सुरांचे वातावरण निर्माण करत जाणे आणि मग ते २-४ मिनिटे वाजवल्यानंतर सुरुवात करण्यात काय मजा असते याचे प्रात्यक्षिक मी नेहमी करीत असतो.’’ एकदा सोलापूरला अशीच मैफल चालू होती. शेवटची भैरवी कुमारांना मध्यमामध्ये गावयाची होती. अर्थात तंबोऱ्यांच्या पंचमाचा त्यांना मध्यम करायचा होता. पण लोकांची गडबड एकसारखी सुरु होती. कुमारांनी दोन-तीन वेळा विनंती करून ‘शांत राहा’ म्हणून सांगितले. लोकांना त्या शांततेचे महत्व वाटत नसल्यामुळे त्यांच्या गप्पा सुरूच होत्या. कुमार तंबोरे मध्यमामध्ये लावू शकेनात. शेवटी रागावून ‘मला मध्यमाचे तंबोरे लावण्यासाठी शांतता मिळू देत नसाल तर हे गाणे येथेच संपले असे मी जाहीर करतो’ एवढे बोलून कुमार उठले सुद्धा. तेव्हा प्रभुदेव सरदार यांनी लोकांना शांत राहण्याबद्दल बजावले. शांतता झाली, तंबोरे लागले व मग भैरवी झाली.
अव्यवस्थित लागलेल्या तंबोऱ्यात गाणे रेटून नेणे कुमारांना कधीच मंजूर नाही. तंबोरे लावण्याची इतकी चिकित्सा जरी कुमार करीत असले तरी ते नेहमी म्हणतात, ‘‘आपले तंबोरे बरोबर लागले असे जरी आपणाला वाटत असले तरी ते अगदी तंतोतंत बरोबर असतीलच असे नाही. काहीतरी न्यून त्यामध्ये राहून जाते. असे तंतोतंत तंबोरे क्वचितच लागतात.’’ अलीकडे या वर्षातील मैफलीत तंबोरे लावण्याबाबत फार कीस काढण्याचे ते टाळतात असे माझ्या पाहण्यात आले आहे. कदाचित त्यांच्या स्वतःच्या स्वराच्या परिपक्वतेबरोबर ही चिकित्सा कमी झाली असावी. तंबोरे मिळवताना कुमार खुंट्यांवरच (खुंट्या कमी-जास्त सैल अगर घट्ट करूनच) ते मिळवतात. मण्यांचा उपयोग अगदी माफक, थोडासा फरक करण्यापुरताच ते करतात. नाहीतर पुष्कळ गायक मणी खाली मेरूपर्यंतही नेऊन स्वर मिळवतात – जे कुमारांच्या मते प्रशस्त नाही. अशा प्रकारे जास्त अगर कमी केलेला स्वर टिकून राहात नाही व ‘तो स्वर खरा नव्हे, तर कृत्रिम आहे’ असे त्यांचे मत आहे. नुसत्या खुंट्यांवरच तंबोरे लावणे हे किती जिकिरीचे आहे हे ते कर्म करणाऱ्या गायकालाच उमजण्यासारखे आहे, इतरांना खास नाही.
तंबोरे सुरात मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो व त्रास पडतो, त्याचप्रमाणे ते शिस्तीत वाजवण्यासाठी लागणारे मदतनीस मिळवणे कठीण जाते. तसेच तंबोऱ्यांची वाहतूकही फार धोक्याची गोष्ट आहे. मेहनतीचे (रियाजाचे) वेळीही तंबोरे वाजवणारे मिळतीलच असे नाही. तेव्हा या सर्व अडचणींचा विचार करून काही वाद्यांच्या कारखानदारांनी स्वयंप्रेरित अशी तंबोरा-पेटी बनवली आहे. रेडिओप्रमाणे असणाऱ्या त्यातील चाव्यांनी स्वर कमी-जास्त करता येईल अशी व्यवस्था केलेली असते. अशा या पेट्या विजेवर अगर बॅटरीवर चालणाऱ्या असतात. असेच एक वाद्य-कारखानदार त्यांची स्वयंप्रेरित स्वर-पेटी घेऊन कुमारांकडे आले व त्यांनी ती लावून दाखवली. कुमारांचा अभिप्राय त्यांनी विचारला. कुमारांनी उगाच खोटी स्तुती करायचे टाळले व आपले स्पष्ट मत खालील शब्दात सांगितले ते नमूद करण्यासारखे आहे, ‘‘दोन मोटारींचे हॉर्न बिघडले (बंद होत नसले) व ते सुरात मिळाल्यासारखे वाटले म्हणजे जसा आवाज येईल तसा हा आवाज येत आहे. याला संगीताचे गुणधर्म (musical qualities) मुळीच नाहीत. तंबोऱ्यांचा जिवंतपणा व संगीताचे माधुर्य यात कधीही येणे शक्य नाही.’’ वास्तविक या अशा स्वरपेट्या खूप प्रसिद्ध वाद्यवादक हल्ली वापरू लागलेले आपण पाहतो. त्या पेट्यांतील नादमाधुर्याचा कमकुवतपणा न जाणता फक्त सोय पाहणारे कलावंतच हा वापर करीत असतील हे उघड आहे.
पंचमाच्या तंबोऱ्याचा वापर करणे हे शास्त्रशुद्ध आहे व ही गोष्ट जरी सिद्ध करता येत असली तरी काही निषाद वापरणाऱ्या घराण्यांचे लोक किती दुरभिमानाने पछाडलेले आहेत याचा नमुना मला कुमारांच्या मैफलीत पाहायला मिळाला. कुमारांचे देवधर स्कूलमध्ये एकदा सकाळचे गाणे ठरले होते. मी, वसंतराव देशपांडे, वामनराव, पांडुरंगशास्त्री देशपांडे व आणखी बरीच मंडळी येथून रात्रीच्या गाडीने निघून सकाळी मुंबईला पोहोचलो. त्या दिवशीचा कार्यक्रम अगदी निवडक मंडळींसाठीच होता. देवधर स्कूलमधील विद्यार्थ्यांनी कुमारांचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. सुरुवातीपासूनच कार्यक्रम रंगला होता. विशेषतः देसकार फारच रंगला. माझ्या शेजारी किराणा घराण्याचे अभिमानी असलेले एक जाणकार बसलेले होते. देसकार होईपर्यंत हे जाणकार उत्स्फूर्त दाद देत होते. देसकार संपताच ह्या गृहस्थांनी मला डिवचून विचारले, “काय हो, तंबोरे पंचममध्येच मिळवलेले ऐकू येत आहेत. निषाद लावला नाही तंबोऱ्यात?” मी त्यांना सांगितले, “कुमार तंबोऱ्यात निषाद लावीत नाहीत”. माझे उत्तर ऐकताच त्या गृहस्थांचा मैफल ऐकण्याचा दृष्टिकोन एकदम बदलला. त्यांची वाहवा एकदम बंद पडली. त्यांनी जी मान खाली घातली ती भैरवी संपेपर्यंत वरच केली नाही. सर्व सभा वाहवा देत होती पण त्या जाणकाराला केवळ निषादचा तंबोरा नाही म्हणून एकही जागा वाहवा देण्यासारखी वाटली नाही. काय हा घराण्याचा दुरभिमान! बैठक समाप्त झाल्यावर ते जाणकार काहीही न बोलता तेथून अगदी निमूटपणे निघून गेले.
मैफल सुरु होण्यापूर्वी कार्यक्रम ज्या हॉलमध्ये असेल त्याला लागून असलेल्या एखाद्या खोलीत कुमार अर्धा-पाऊण तास अगोदर तंबोरे लावण्यात दंग झालेले असतात. तंबोरे जसजसे लागत जातात तसतशा तंबोऱ्याच्या तारांबरोबर कुमारांच्याही मनाच्या तारा जणू काही जुळत असतात. त्या ठिकाणी नीरव शांतता हवी असते.
ती शांतता कोणीही बिघडवलेली कुमारांना चालत नाही. कुमार जणू काही षड्जमय झालेले असतात. अशा वेळी कोणीही अचानक येऊन त्यामुळे त्यांची तंद्री भंग पावली की कुमार अगदी अस्वस्थ होऊन जातात. तंद्री मोडणाऱ्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा ते विचार करीत नाहीत. याचे एक उदाहरण माझ्या स्मृतीत आहे. कुमारांचे गाणे कल्याण गायन समाजात होते. कार्यक्रम ज्या हॉलमध्ये होता त्याच्या वरच्या मजल्यावर कुमार तंबोरे मिळावीत होते. पु. ल. देशपांडे इत्यादी भक्तगण जवळ बसून तंबोरे लावण्याच्या प्रक्रियेचे निरीक्षण करीत होते. संपूर्ण शांतता होती. सर्व भक्तगणांना अशा रीतीने तंबोरे मिळवताना स्वस्थ बसून त्या आनंदाचा उपभोग घेण्याचा सराव झालेला होता. इतक्यात सॉलिसिटर लाड नावाची एक प्रतिष्ठित व्यक्ती समाजात येऊन थडकली. हॉलमध्ये चौकशी केल्यावर त्यांना कुमार वरच्या मजल्यावर आहेत हे कळले. ते तसेच वर आले व नमस्कार चमत्कार वगैरेची भाषा मोठमोठ्याने करू लागले. कुमारांचा अगदी विरस झाला पण सॉलिसिटर साहेबांना कसे बोलायचे म्हणून कुमार पु.ल.कडे पाहून म्हणाले, “अरे भाई, मी तंबोरे लावतो आहे. तुम्हाला काय बोलायचे असेल ते खाली जाऊन बोला की”. सॉलिसिटर साहेबांना आपला अपमान झालासे वाटले आणि ते रागाने निघून गेले व कार्यक्रमालाही थांबले नाहीत. वास्तविक एखाद्या समजूतदार माणसाने चटकन दिलगिरी प्रदर्शित केली असती व कुमारांच्या या एकतानतेचे कौतुक केले असते. पण अशा वेळी काही प्रतिष्ठित माणसे आपल्या प्रतिष्ठेलाच चिकटून बसतात व महान आनंदाला मुकतात. कलाकारांचे वैभव पाहायचे असेल तर आपले प्रतिष्ठेचे गाठोडे सूज्ञांनी घरीच ठेवून यावे. त्याशिवाय निर्भेळ आनंद कधीच मिळणार नाही.