कुमारस्मृती पुष्प १२​

कुमारांच्या, आजारी पडण्यापूर्वी व आजारातून उठल्यानंतर, ज्यांनी अनेक मैफली डोळसपणे ऐकल्या त्यांना त्यांच्यातील फरक निश्चितपणे जाणवल्याशिवाय रहात नाही. कुमारांची वृत्ती लहानपणापासूनच बंडखोर होती. त्यामुळे आजारापूर्वीच्या मैफलींत आक्रमक वृत्ती एकसारखी उफाळून येत असे. ‘झेप’ हेच जणू काही त्यांच्या गायकीचे सूत्र असे व त्या ‘झेप’ या सूत्राला अनुलक्षूनच असलेल्या चिजा ते बैठकीत सादर करीत. प्रत्येक रागात अशारितीने झेपावणाऱ्या चिजांचाच त्यांचा संग्रह फार. अशा चिजांची फार मोठी यादी सादर करावी लागेल. त्यातील काही चिजांचा निर्देश करता येईल. उदा. भूपातील ‘निंदरिया माई’, ‘नूमन जोबन मानदा’, बिहागमधील ‘डरिये वा’ हा ख्याल, किंवा त्रिताल मधील ‘मैया घर जाने दे’, चंद्रकंस मधील ‘येरी पिया’ हा झपताल, किंवा ‘जोबनारे ललैया’ हा त्रिताल. बागेश्री मधील ‘गुंद लावोरी मालनिया’, लंकेश्री मधील ‘धन धन मंगल गावो’ अशा भरारी मारणाऱ्या चिजा सादर करून बैठकीत प्रभुत्व स्थापन करणे हा कुमारांचा आवडता खेळ असे. लहानपणातच प्रसिद्धी मिळाल्यामुळे मोठमोठ्या कॉन्फरन्स मध्ये कुमारांना हटकून बोलावणे असे. अशा संगीताच्या कॉन्फरन्सेस द. भारतापेक्षा उ. भारतातच जास्त आयोजित केल्या जात असत. त्या ठिकाणी एकाच मैफलीत अनेक कलाकारांना हजेरी लावण्याचा प्रसंग येई. असे क्रीडाक्षेत्र कुमारांच्या हाती लागल्यावर त्यांच्या आक्रमक वृत्तीला अजून काय पाहिजे! कितीही श्रेष्ठ गायक आधी गाऊन गेले तरी कुमार त्यानंतर आपल्या आक्रमक गायकीने पहिला रंग पुसून टाकीत. अशा कॉन्फरन्सेस मध्ये काही वेळा कुमार जरा मिश्कीलपणा करीत असल्याचेही ऐकिवात आहे. कोणत्याही गवयाचे गाणे हुबेहूब नकलून दाखवणे हा तर कुमारच्या हातचा मळ असे. स्वतःचा कार्यक्रम सादर करताना कुमार आपल्यानंतर गाणाऱ्या गवयांचीच झलक आपल्या गाण्यात आणून त्या गवयांना गाणे मुश्किल करून टाकीत. अलाहाबादच्या एका कॉन्फरन्स मध्ये कुमारांनंतर फैयाजखा गाणार होते. कुमारांनी आपल्या गाण्यात फैयाजखाची सर्व अंगे घेतली आणि अखेर फैय्याजखा म्हणाले की ‘मी आज गाणार नाही, उद्या गाईन!’ बालवयात स्वतंत्र मैफलीपेक्षा त्यांना कॉन्फरन्स मधेच गाण्याची सवय झाली होती. अगदी लहान वयापासून जनसमुदायासमोर गात असल्यामुळे भीती म्हणजे काय हे त्यांना माहीतच नव्हते. कलकत्त्याच्या एका कॉन्फरन्स मध्ये तेथील व्यवस्थापकाने या लहान मुलाची जरा फजिती करावी म्हणून बडे गुलामअली यांच्या नंतर कुमारांचा क्रम लावला. पण कुमारांवर कसलाच परिणाम झाला नाही. रंगमंचावर चढून अस्तन्या सावरून चंद्रकंस मधील ‘येरी पियाबिन’ ही चीज काढून त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलेच.

आजारापूर्वी कुमारांच्या ज्या मैफली होत त्यात ते पारंपारिक चिजाच पेश करीत असत. कुमारांच्या तेज गळ्याने साज चढविल्यावर जुन्याच चिजा काही वेगळेच वैभव दाखवित. आणि सारखे असे वाटे की या चिजा आपण पूर्वी ऐकल्या तेव्हा इतक्या चांगल्या वाटत नसत पण आता त्या काय खुशबू भरलेल्या वाटत आहेत! आपण त्या चिजांचं सौंदर्यच पाहिलं नाही. आताही कुमारांनी त्या जुन्या पारंपारिक चिजा लोकांना ऐकवाव्यात पण ते त्यांच्या मनाने घेतले पाहिजे. वास्तविक जुन्या सर्व नामवंत गवयांनी आपल्या चिजांचा खूप मोठा खजिना मुक्त कंठाने त्यांना दिला आहे. कुमार खुशीत असले म्हणजे ‘ही जुनी पारंपारिक चीज अमुक गवई कसे गात असत हे म्हणून दाखवतो’ असे म्हणून गाऊन दाखवतात तेव्हा त्यांच्या स्मरणशक्तीचे आश्चर्य वाटते. उदा. भीमपलास रागातील ‘ढोलन मेंढे घर आवे’ ही चीज रजबलीखा कशी गात असत ती कुमारांनी श्री. मंगरूळकरांच्या एकसष्टी निमित्त झालेल्या कार्यक्रमात म्हणून दाखवली होती. ही चीज मी अनेक गवयांकडून ऐकलेली आहे पण त्या चिजेत काय सौंदर्य आहे हे त्या दिवशी उमगले. दुसरे एक उदाहरण म्हणजे, बिलावल रागातील ‘कवन बटरिया गईलो’ ही चीज त्यांनी अशीच एकदा म्हणून दाखवली होती. त्या चिजेतील ‘कवन्’ या शब्दातील न् चा उच्चार अर्धवट करण्यात काय मजा आहे हे त्यादिवशी समजले. एक वृद्ध श्रोते तर म्हणाले, ‘चिजेच्या नुसत्या तोंडानेच कुमारांनी श्रोत्यांना खिशात घातले की हो!’ त्यांच्या त्या उद्गारांची मला मोठी मौज वाटली.

गेल्या १०-१२ वर्षात कुमारांच्या ज्या असंख्य मैफली पुण्यात झाल्या त्या प्रत्येक मैफलीत त्यांनी दरवेळी नवीन नवीन रागांची दालने श्रोत्यांना दाखवली. कधीही तेच तेच राग मैफलीत गाऊन कुमार श्रोत्यांना कंटाळा आणीत नाहीत. काही त्यांचे आवडते राग मात्र पुन्हा गायले गेले तरी त्या रागांचे निराळे सौंदर्य प्रतीत होई. त्यांच्या आवडत्या रागांमध्ये काही पारंपारिक राग आहेत तर काही त्यांनी स्वतः तयार केलेले राग आहेत. उदा. शंकरा, भूप, बिहाग, यमन, हमीर, बागेश्री इत्यादी पारंपारिक राग त्यांनी अनेकदा गायले आहेत. आणि स्वरचित रागांमध्ये लगनगंधार, मालवती इत्यादी रागांचा उल्लेख करता येईल. लंकेश्री आणि कौशी देखील त्यांचे आवडते राग. पारंपारिक रागांमध्येही ते काही वेगळीच सौंदर्यस्थळे लोकांना दाखवून जातात. काही रागांच्या पारंपारिक कल्पनांनाही त्यांनी धक्के दिले पण तेसुद्धा आधार दाखवूनच. उदा. बागेश्रीतील त्यांचा पंचमचा उपयोग अनेकांना खटकणारा आहे. हमीरमधील पंचमचा उपयोग व त्याचे त्या रागातील महत्व श्रोत्यांना स्तिमित करते. देसकार मधील निषादाचा अंशतः उपयोग अतिशय रंजक वाटतो पण श्रोत्यांना असा देसकार कधी ऐकायला न मिळाल्यामुळे पारंपारिक गायनाविरुद्ध असलेला हा प्रयोग जुनाट श्रोते मानीत नाहीत. शंकरा मधील ‘प ध नि’ ही सरळ स्वरांची संगती (धैवत अल्प असलेली) लोकांना खटकते. पण अशी संगती असलेल्या जुन्या चिजा या प्रयोगाला भरभक्कम आधार ठरतात. प्रत्यक्ष त्यांना ‘हे असे का?’ असे विचारण्यास कोणी धजत नाही आणि मग गैरसमजाच्या वावड्या सगळीकडे पसरतात. त्याला कुमार काय करणार… बागेश्रीमध्ये पंचमवर सम असलेला ख्याल (अबना रहो) कुमारांच्या संग्रही आहे हे बहुसंख्य श्रोत्यांना माहित नसते. एकदा तर त्यांनी दरबारी कानडा मध्ये कोमल गंधार जवळ जवळ टाळून त्या रागाचे मनोहारी रूप श्रोत्यांना ऐकवले. तसेच अडाण्यामध्ये दोनही निषादांचा वापर ते अतिशय रंजकतेने व कौशल्यपूर्ण रितीने करतात. या सर्व गोष्टींची कुमारांबरोबर चर्चा केली तर संशयनिवृत्ती होईल पण हे केव्हा होईल हे मात्र सांगता येत नाही.

पारंपारिक राग गाताना कुमार बंडखोरपणा करतात असे बहुसंख्य संगीतज्ञ श्रोत्यांना वाटत असेल. वास्तविक हा बंडखोरपणा नसतो तर कुमारांच्या चिंतनातून हे वेगळेपण निर्माण झालेले असते. त्या वेगळेपणाचे निरसन करून घेण्याचे कोणी मनात आणीत नाही. श्रोत्यांना तितकी सवड नसते असे म्हणण्यापेक्षा आस्था नसते असेच म्हणणे योग्य ठरेल. रागस्वरूपाबद्दल, स्वरांच्या लगावाबद्दल, स्वरसाधनेबद्दल, ताल व लय याबद्दल, बंदिशींबद्दल कुमारांची खास चिंतने आहेत. त्यांचा परिचय सर्व जाणत्या श्रोत्यांनी, होतकरू गायकांनी अवश्य करून घेतला पाहिजे. त्याशिवाय कुमारांच्या गाण्याची उपपत्ती लावणे खरोखर अशक्य आहे. १९७२ मध्ये Writer’s Centre या संस्थेतर्फे चर्चेचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात कुमारांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांनी त्यांची उत्तरे प्रात्यक्षिकासह उत्कृष्टपणे दिली होती. त्या चर्चेचा कार्यक्रम टेपही करून ठेवण्यात आला आहे. सुमारे दीडशे श्रोते तो कार्यक्रम ऐकण्यास आले होते. पण पुढे त्याचा प्रसार करण्याचे काम झालेले दिसत नाही. असा चर्चेचा कार्यक्रम एकदाच ठेऊन भागणार नाही. असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले पाहिजेत. त्यात अधिकारी लोकांना बोलावून प्रात्यक्षिकासह चर्चा करून त्याचे प्रसिद्धीकरण केले पाहिजे. तरच श्रोत्यांमधील व गायकामधील गतानुगतिकत्व थांबेल व गायनातील सौंदर्यास्वाद मुक्तपणे लोकांना घेता येईल.

प्रत्येक राग ऐकताना श्रोत्यांनी व गाताना गायकांनी त्या रागाच्या काही ठोकळ मानाचाच फक्त विचार केलेला असतो. त्या रागाच्या मूळ प्रकृतीकडे कोणीच जात नाही. एका विशिष्ट दृष्टिकोनातूनच त्या रागाकडे पाहण्याची सर्वांची प्रवृत्ती असते. एकच प्रदर्शनीय आकृती निरनिराळ्या दृष्टिकोनातून पाहिली असता निरनिराळा आनंद देऊ शकते. एकच ताजमहाल अनेक दृष्टिकोनातून निरनिराळ्या वेळी पाहिला तर वेगवेगळा आनंद देतो ही गोष्ट सर्वांच्याच परिचयाची आहे. प्रत्येक रागाचे असे दर्शन का घडू शकणार नाही? राग हा नुसत्या आरोह अवरोहाने मुळीच तयार होत नसतो. धावत्या रेषांनी ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर पक्ष्याचे आपण चित्र काढतो त्याप्रमाणेच राग वर्तवित असताना त्याचे स्वरूप उलगडले जात असते. नुसत्या वादी संवादींनीही राग समजून घेता येत नाही. त्यामुळे एकच राग एकाच गायकाच्या मुखातून अनेक वेळा आपण ऐकला तर दरवेळी त्याचे वेगळे सुंदर रूप दिसले पाहिजे. आरोह-अवरोह-स्वरूप फारतर प्राथमिक अवस्थेत बोट दाखवण्यापुरते मानता येईल. कुमारांचा एकच शंकरा राग वेगवेगळ्या वेळी निरनिराळी अनुभूती देऊन जातो. कोमल गंधारावर भरपूर आंदोलन घेतलेला दरबारी कानडा कुमारांकडून मी बरेच वेळा ऐकलेला होता. ज्या मैफलीत कुमारांना ह्या गंधाराला गौणत्व देऊन हा राग म्हणायचा होता त्या मैफलीच्या आधी तंबोरे जुळवल्यावर जेव्हा त्यांचा या रागाची रूपरेषा म्हणण्याचा प्रयत्न चालला होता तेव्हा मला ते वेगळेपण जाणवले. व मी कुमारांना विचारले, ‘हा दरबारी असा कसा?’. तेव्हा कुमार म्हणाले, “तुम्हाला प्रचारातील दरबारी पाहिजे का! तो मला येतोच. पण हे स्वरूप बघा. या स्वरूपाने दरबारीला कोठे न्यूनत्व येते का? काही वेगळे सौंदर्य यात दिसते.” मला त्यांचे म्हणणे पटले व त्यादिवशी त्यांनी गायलेली ‘गोरी तोरे नैना’ ही त्रिताल मधील चीज अल्प गंधार वापरूनही अत्यंत आकर्षक वाटली. ह्या ठिकाणी उदाहरण म्हणून हे सांगितले. त्याप्रमाणे इतरही रागांचे असेच दर्शन श्रोत्यांना घडणे सहज शक्य आहे. जयजयवंती हा राग बागेश्री अंगाने निराळे व देस अंगाने निराळे असे सौंदर्य आपणाला दाखवून देतो. कित्येक जुने पारंपारिक राग ठोकळेबाजीत अडकल्यामुळे श्रोत्यांना ते ऐकण्याचा व गायकांना ते गाण्याचा मनस्वी कंटाळा आलेला दिसतो. एखाद्या गायकाने दुर्गा गायला सुरुवात केली तर श्रोते त्याकडे दुर्लक्ष करू लागतात. दुर्गा राग गाणे अगदी कमी प्रतीचे आहे असे समजले जाते. तसेच भूप राग गाणे सुद्धा क्षुद्र समजतात. खरे पाहायला गेले असता, त्यांतील सौन्दर्यस्थळे आपण पाहिली नाहीत असेच खेदाने म्हणावे लागते. या ठोकळेबाजीनेच बरेच गायक नवीन राग गाण्याच्या मोहात सापडले आहेत असे वाटते. पुष्कळ गायक अहिर भैरव गातील, पण भैरव त्यांना चांगल्या रीतीने गाता येत नसतो. या संदर्भात मला एक आठवण सांगावीशी वाटते. मुंबई रेडिओला मी ऑडिशनसाठो गेलो होतो. एक सारंगीनवाझ ऑडिशनसाठी आले होते. त्यांना परीक्षकांनी प्रश्न विचारला, ‘आपणाला किती राग येतात?’ त्यांनी विनयपूर्वक उत्तर दिले, ‘माझ्या गुरुजींना मला एकच यमन राग शिकवला. तोच मी जन्मभर वाजवत आहे. अजून तो पूर्ण आला असे मला वाटत नाही’. तसेच खांसाहेब अब्दुलकरीम खां यांनाही सतत पूरिया रागाचा रियाझ करण्याचा छंद होता. तेही म्हणत, ‘मी जन्मभर हा राग गात आहे. पण अजून माझे पोट भरले नाही.’

हिंदुस्थानी संगीतामध्ये रागपद्धती हे एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक राग दार वेळी गाताना काहीतरी नवीन अननुभूत असा आनंद देऊन जातो. एकाच रागातील अनेक चिजा निरनिराळे ढंग निर्माण करतात. या संदर्भात कुमारांच्या एका बैठकीचा उल्लेख करावासा वाटतो. गर्दे नावाच्या एका गृहस्थांच्या वास्तुशांतीनिमित्त सेवासदनमध्ये कुमारांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या बैठकीत कुमारांनी मालकंस रागाची विविध रूपे निरनिराळ्या चिजांच्या साहाय्याने दाखविली. ख्यालानंतर त्यांनी मध्यलय एकतात मध्ये ‘छब तेरी’ ही चीज म्हणून मालकंसचे आगळेच दर्शन घडविले. प्रत्येक संपूर्ण रागाचे असे वेगवेगळ्या लयींतील चिजांच्या द्वारे वैविध्यपूर्ण दर्शन घडत असते. नुसत्या रागांचेच वेगवेगळे रूप असते असे नव्हे तर एकच ताल अनेक लयीत विविध प्रकारचा आनंद श्रोत्यांना देत असतो. श्री. मंगरूळकर यांनी या बाबतीतला एक अनुभव मला सांगितला. एका मैफलीत श्री. कुमारांनी एकतात मध्ये निरनिराळ्या लयी घेऊन एकाच तालात मैफल सादर केली आणि एकताल हा निरनिराळे स्वरूप कसे धारण करतो याचा श्रोत्यांना प्रत्यय दिला.

रागदारी संगीत एवढ्यापुरतेच हिंदुस्थानी संगीत मर्यादित आहे असे नाही तर त्या संगीताची ठुमरी, टप्पे, तराणे, लोकगीत, भजने, ही रूपेही तितकीच समृद्ध आहेत. त्या विविध दालनातून डोळस दृष्टीने पाहिले तर विविध अंगांतील सौंदर्य प्रतीत होते. कुमारांच्या संगीतसाधनेतील प्रवास या सर्व दालनातून झालेला आहे व त्यांनी त्या विविध दालनातील सौंदर्यस्थळे रसिकांना दाखवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यांनी सादर केलेला ‘ठुमरी टप्पा तराणे’ हा कार्यक्रम ज्यांनी ऐकला असेल त्यांना वरील विधान पटेल. बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी झालेल्या या कार्यक्रमात कुमारांनी काफी, खमाज, सिंधुरा, देस, श्री, भैरवी, तिलंग या रागातील ठुमऱ्या टप्पे तराणे ऐकवून संगीताचा एक रत्नसमुच्चयच लोकांपुढे ठेवला. त्या दिवशी त्यांनी गायलेला श्री रागातील तराणा श्रोत्यांच्या स्मृतीमध्ये अजूनही असेल. श्री रागाचे उग्र स्वरूप त्यात ठायी ठायी दिसत होते.

ऋतुसंगीत ही कुमारांची अत्यंत उल्लेखनीय कामगिरी मानावी लागेल. निरनिराळ्या ऋतूतील संगीत ऐकवण्याचा प्रयत्न आतापर्यंत कोणत्याही गायकाने केलेला ऐकिवात नाही. कुमारांनी सादर केलेले वर्षा, हेमंत, वसंत ऋतूंचे संगीत हा एक भारतीय संगीतातील अमोल ठेवाच म्हणावा लागेल. या सर्व ऋतूंच्या वर्णनाची गीते म्हणजे रागदारी संगीतातील चिरस्वरूपाच्या चिजाच ठरतील यात संशय नाही. या सर्व ऋतुसंगीताच्या पुस्तिका छापून कुमारांनी श्रोत्यांपर्यंत पोचत्या केल्या आहेत. त्यात प्रत्येक गीताची पार्श्वभूमी, त्याचा अर्थ विशद करून सांगणे इत्यादी गोष्टी करण्यास त्यांना किती प्रयास करावे लागले असतील याची कल्पनाच करवत नाही. वर्षा ऋतू मधील मारव्यातील ‘घाम परे’, गौडमल्हार मधील ‘घन गरजे बरखा आयी’, मियामल्हार मधील ‘का रे मेघा बरसत नाही’ ही रागदारी गीते. तसेच प्रत्येक महिना बदलताना त्याचे केलेले पूर्वदर्शन अपूर्व झाले आहे. उदा. ‘लागो इंद्र आसाड’, ‘लागो सावन मास’, ‘लागो भादव मास’. या ऋतूंच्या वर्णनातच त्या त्या महिन्यातील विशिष्ट देवतांचे जन्मोत्सव बहारदारीने वर्णिले आहेत. उदा. भाद्रपदातील कृष्णाचे वर्णन करताना, ‘जसोदाके मंदिर बेगी चलो री’ किंवा ‘आज नंद के द्वारे भीर’ ही गीते श्रोत्यांना भक्तिरसात बुडवून सोडतात. शरद ऋतूचे वर्णन करताना ‘आनंद झरायोरी’ या गीताने शरद ऋतूतील धवल पौर्णिमा श्रोत्यांच्या मनश्चक्षूंपुढे उभी राहते. त्याच ऋतूमधील देवीची आराधना ‘वरदायिनी हो री’ या गीतात संपूर्ण साकार होते. दिवाळीतील दिव्यांची शोभा ‘दीप की ज्योत जरे’ या गीतात वर्णिली आहे तसेच दिवाळीच्या सणाची वैशिष्ट्ये ही त्यात थोडक्यात आणलेली आहेत. ‘घोडी नाचत खुंदत नगरे गयी’ या गीतात आपण खेडेगावातील सीमोल्लंघन पाहत आहोत असा भास होतो. विरहिणीची व्यथा केदार मधील ‘बैठी हूं अकेली’ या चिजेतून डोळ्यापुढे उभी राहते. गीत वसंत मधील बहार रागातील ‘रस बरसायो रे’ व ‘भवर मन गेल्यो’ या चिजा खरोखरच बहारदार झाल्या आहेत. शिशिर ऋतूमधील भीमपलास रागातील ‘आयो रंग फाग’ हे होरी गीत रंगपंचमीचा रंग उडवून देते. ‘कंचन पिचकारी’ या अडाण्यातील गीतामध्ये रंगपंचमीची उडालेली धमाल श्रोत्यांना सुखावते.

ऋतुसंगीताप्रमाणेच ‘माळवी लोकगीते’ सादर करण्याचे महत्प्रयासाचे काम कुमारांनी केले आहे. सामान्य लोक जे संगीत निरनिराळ्या प्रांतात निरनिराळ्या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उत्स्फूर्त रीतीने गाऊ लागतात तीच लोकगीते होत. व त्यात पुष्कळसे आपल्या रागदारी संगीताचे धागेदोरे दिसून येतात. ही माळवी लोकगीतेसुद्धा डोळस रीतीने ऐकावी लागतात व मगच त्यातले सौंदर्य आपल्याला दिसू शकते. असाच बालगंधर्व रंगमंदिरात कुमारांचा ‘माळवी लोकगीतांचा’ कार्यक्रम होता. मध्यंतरामध्ये एक जाणकार श्रोते (एका गायकाचे वडील) माझ्याजवळ आले व म्हणाले, “अहो, हे संगीत काही आपल्या कानात शिरत नाही बुवा. कुमारांना एखादं नारायणरावांचं नाट्यगीत गायला सांगा ना.” त्यांच्या त्या बोलण्याला काय उत्तर द्यावे हे मला सुचेना व ते बोलणे मी हसण्यावारी नेले. वर निर्दिष्ट केलेल्या श्रोत्यांना लोकगीतामधील मर्म कसे उमगणार!

कुमारांचा निरनिराळ्या भजनांचा संग्रह अलौकिक ठरेल. त्यात सर्व प्रकारच्या भजनांचा समावेश आहे. सूरदास, कबीर, तुलसीदास व मीराबाईंनी भजने त्यांनी उत्कृष्ट रीतीने सादर केलेली आहेत. त्यांना दिलेल्या चाली दरवेळेस नवीन रूप धारण करतात. त्यांच्या लयीमध्ये विविधता आहे. ताल वेगवेगळे व वेगवेगळ्या लयीत आहेत. वर दिलेल्या संतकवींपैकी तिघांची भजने संग्रहित करून त्यांनी ‘त्रिवेणी’ नावाचा एक स्वतंत्र कार्यक्रमच सादर केलेला आहे. ह्या भजनांची Long Play रेकॉर्ड नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ती ऐकली म्हणजे आपण एक मैफलच ऐकत आहोत असा अपूर्व आनंद श्रोत्यांना जरूर येतो. भजनांचे विषय निरनिराळे आहेत. त्यांची काही निर्गुणी भजने तर खूपच लोकप्रिय झालेली आहेत. ‘गांधीप्रार्थना’ हा जो दर शुक्रवारी कार्यक्रम होत असे त्यात ‘धुन सुनके मनवा मगन हुवा जी’ व ‘अवधूता कुदरत की गत न्यारी’ ही भजने कितीतरी वेळा रेडिओवर वाजवली गेली आहेत. ती भजने अतिशय अर्थपूर्ण आहेत. अर्थ समजून मात्र घेतला पाहिजे. ‘गुरुजी, मैं तो एक निरंजन ध्याऊ जी’ हे गीत ऐकताना गुरु-शिष्यातील एकात्मभाव, अपरंपार भक्ती जाणवते व श्रोत्यांचे डोळे निश्चित पाणावतात. नर्मदावासी व माळवी लोक नर्मदा नदीला उद्देशून ‘नरबदा रंग से भरी’ हे लोकगीत गातात. कुमारांनी हे गीत त्यांच्याच रांगड्या सुरात गाऊन गीत वसंत मध्ये एक वेगळाच रंग निर्माण केला आहे. भजनाच्या जोडीला काही ‘रसिया गीते’ हा एक नवीन प्रकार त्यांनी लोकांना ऐकवला. उदा. ‘मृगनयनी तेरो यार री रसिया’ किंवा ‘रसिया को नार बनावो री’ यावरून कुमारांची दृष्टी भजनांच्या बाबतीत किती चौफेर आहे हे दिसून येते.

वर काही मोजक्या भजनांचाच मी निर्देश केला आहे. प्रत्येक ऋतूंच्या वर्णनाचे कुमारांचे गायन म्हणजे फार मोठा परीक्षणाचा विषय आहे. त्यातील कित्येक गीते रागदारीत ख्याल (बडा किंवा छोटा) होण्याच्या योग्यतेची आहेत. अभ्यासू लोकांना त्यांचा किती उपयोग होईल हे आज सांगूनही समजण्यासारखे नाही. जुन्या पारंपारिक परंतु अपभ्रष्ट झालेल्या चिजा गाण्यापेक्षा ह्या चिजा अर्थासहित व संगीतासहित जर श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत नेऊन भिडवता आल्या तर काय बहार होईल. शास्त्रीय संगीताबद्दलची अप्रीती लोकांच्या मनातून कायमची दूर होईल व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची होत असलेली अवहेलना निश्चितपणे थांबवता येईल. गीत-हेमंत मधील ‘सोहत हथमा बीन’ हे बागेश्री मधील झुमरा तालातील सरस्वतीच्या वर्णनाचे गीत बागेश्रीचा उत्कृष्ट ख्याल म्हणून गायला जाईल (लेखक इथे असे म्हणू इच्छितात की ‘जरी गीत हेमंत मध्ये कुमारांनी हा ख्याल थोडक्यात व गीत म्हणून गायला असला तरी विस्ताराने गाण्याची पूर्ण क्षमता या ख्यालात आहे). प्रत्येक ऋतूच्या वर्णनात अशा प्रकारची रागगीते समाविष्ट करून त्या ऋतूंच्या कार्यक्रमाला कुमारांनी रागदारी संगीताचा बाज आणला आहे व आपण प्रत्यक्ष शास्त्रीय मैफलच ऐकत आहोत असा श्रोत्यांना क्षणोक्षणी प्रत्यय येत असतो.


One reply on “कुमारस्मृती पुष्प १२​”

Best articles.
Especially Kumarjis thoughts on tuning the tanpuras are very educative for new generation.I am fortunate to listen all these thoughts from Kumarji only.Thanks for sharing .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *