बैठक फौंडेशन आयोजित मेघना सरदार यांचे धृपद गायन – अपूर्व पेटकर
‘दीप गृह अकादमी’, मोरगाव चौफुला व ‘सिटी ऑफ चाईल्ड’, कासुर्डी, यवत – ०५ सप्टें २०१८
काही दिवसांपूर्वी सौमित्रकडून बैठक फौंडेशनच्या कामाबद्दल व आगामी कार्यक्रमांविषयी ऐकल्यामुळे ०५ सप्टेंबर रोजी मेघना सरदार ह्यांच्या धृपदच्या कार्यक्रमाला मी उपस्थित रहायचे ठरवले. मेघना ताई ह्या प्रसिद्ध धृपद गायक पं. उदय भवाळकर यांच्याकडून अनेक वर्षे तालीम घेत आहेत. त्यांना पखवाजावर श्री. गणेश फापळ, तालयोगी पं. सुरेश तळवलकर ह्यांचे शिष्य, यांनी समर्पक संगत केली.
पाहिले सत्र दुपारी २:३० वाजता ‘दीप गृह अकादमी’, चौफुला येथील शाळेत झाले. तिथे शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक आणि चौथी ते दहावी या वर्गांमधील विद्यार्थी असे अंदाजे 100 ते 125 श्रोते उपस्थित होते. मुलांना कार्यक्रमाच्या स्वरूपाची पूर्व कल्पना होती, आणि कार्यक्रमाच्या सुरवातीला मेघनाताईंनी धृपदच्या प्राचीनतेबद्दल, पद्धतीबद्दल, धृपद आणि इतर संगीतप्रकारातील फरकांबद्दल मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितले. त्यामुळे, नवीन गायनप्रकार असला तरी मुलांना तो समजण्यासाठी याचा उपयोग झाला. सुरवातीला राग वृंदावनी सारंग मधे आलाप, जोड (नोमतोम) ने सुरवात करुन तत्पश्चात सूलतालामधील एक धृपद सादर केले.
सुमारे ३० मिनिटांच्या प्रस्तुतीनंतर मेघनाताई व मुलांमध्ये प्रश्नोत्तराचे सत्र झाले. मुलांना आणि बऱ्याचशा शिक्षकांना हा संगीतप्रकार नवीन होता. पखवाज हे वाद्य पारंपरिक वारकरी संप्रदाय, भजन, कीर्तन सोडून शास्त्रीय गायनातही वापरले जाते ही माहिती नवीन होती. धृपद गाण्याची पद्धत ख्याल किंवा इतर संगीतप्रकार यांपेक्षा वेगळी आहे, ह्यात पखवाज गाण्याशी ‘बराबरी’त संवाद साधतो, पण ख्याल गायकी मध्ये तबला गण्याबरोबर संवाद न साधता ठेका देऊन साथीचे काम करतो, ह्यामुळे धृपद चा ‘माहोल’ हा ख्याल किंवा इतर वरचेवर ऐकल्या जाणाऱ्या संगीतापेक्षा वेगळा असतो हे जाणवले.
मुलांच्या प्रश्नांना अचूक आणि समजतील अशी उत्तरं मेघनताईंनी दिली. उदाहरणादाखल, अनेक जणांनी तानपुरा पहिल्यांदाच बघितला होता, सतार / वीणेबरोबर मुलांनी त्याची तुलनाही केली. मग ‘त्याचे वजन काय?’, ‘तुम्ही कधीपासून तानपुरा शिकत होतात?’, ‘किती अवघड असतो?’ असे सामान्य ज्ञानाचेही प्रश्न मुलांनी विचारले. नंतर कालाकारांबद्दल आणि त्यांच्या रियाजाबद्दलही प्रश्न विचारले. ‘प्राथमिक शिक्षण कोणाकडे झाले’, ‘कधीपासून गाणे / वाजवणे करत आहात’, ‘तुम्हाला हे शिकणे अवघड गेले का सोपे’ ह्याचबरोबर काही विशेष लक्षणीय प्रश्न सुद्धा उपस्थित केले, उदाहरणार्थ, ‘बंदीशींची भाषा कोणती असते?’ त्यावर ‘अनेक बंदिशी ब्रज भाषेत असतात’ असे सांगून, इतर भाषांपेक्षा जवळ जवळ सर्व बंदिशी ह्याच भाषेत का आढळतात, हे देखील मेघनताईंनी सांगितले. नंतर काही अधिक माहिती सुद्धा दिली, जसे की ह्या बंदिशी कोणी बांधल्या, तानसेनाचे धृपद संगीतासाठी किती मोलाचे योगदान आहे इत्यादी.
नंतर गणेशदादांने पखवाजकाही वेळ स्वतंत्र पखवाज वादन केले. त्यात त्यांनी मुलांना आणि शिक्षकांना ओळखीचे असे काही भजन-किर्तन परंपरेमध्ये वाजवले जाणारे ठेके व लाग्ग्या सादर केल्या. ठेक्यांनंतर त्यांनी काही पारंपरिक शास्त्रीय परण देखील पेश केले. गणेश-परण आणि शिवस्तुती-परण वाजवले. पाखवाजाचा हा बाज मुलांसाठी नवीन होता. मुलांनी गणेश दादालाही प्रश्न विचारले आणि पखवाजबद्दल माहिती विचारली. गुरूंबद्दल विचारले, रियाजबद्दल विचारले आणि गणेश दादानी त्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर पखवाजाची उत्पत्ती कशी शंकरकडून झाली आणि पाहिले पखवाज गणपतीने कसे वाजवले हे सांगितले.
मेघनाताईंनी नंतर मुलांना प्रत्यक्ष अनुभव यावा आणि नवीन काही कळावं म्हणून मालकंस मधील धुपादाची स्थायी मुलांना शिकवली. आधी मुलांना अवघड, कंटाळवाणं वाटलं, पण काही वेळा गायल्यानंतर टाळीने ताल दिल्यामुळे तालात यायला येतंय हे कळल्यानंतर त्याची मजा त्यांनी अनुभवली. मग उत्स्फूर्तपणे ३-४ वेळा त्यांनी ताईंच्या मागे व नंतर १-२ वेळा सगळ्यांनी एकत्र गायन केले.
शाळेतले सत्र झाल्यानंतर ‘सिटी ऑफ चाईल्ड’ या कासुर्डी, यवतयेथील २० एकर परिसरात निसर्गरम्य वातावरणात निर्माण केलेल्या मुलांच्या वसतिगृहात कार्यक्रम झाला. मुलांना कसे शिक्षण दिले जाते, संपूर्ण वसतिगृहाचे काम कसे चालते, तेथील शेतीप्रकल्प, ह्याचा आढावा निंबाळकर सरांनी दिला. ते वातावरण संगीत कार्यक्रमांसाठी खूपच आनंददायी आहे. मेघना ताईंनी सुरवात राग ‘मारू’ने केली. आलाप, जोड (नोमतोम) नंतर चौताल मधे बांधलेले एक धृपद सादर केले. या प्रस्तुतीनंतर गणेश दादांनी पखवाजाचा शास्त्रीय बाज १२ चौतालात उलगडून दाखवला. काही गत-तुकडे, रेला, वाजवून मुलांना टाळीनी ताल द्यायला सांगून ‘शिव-परण’ आणि ‘दुर्गा-परण’ वाजवले. पखवाजच्या सोलो नंतर ताईंनी मुलांना एक स्थायी शिकवली आणि पखवाजाच्या ठेक्याबरोबर बरोबर गायला शिकवली.
दररोज ऐकल्या जाणाऱ्या संगीतापेक्षा वेगळं आहे हे ही मुलांना जाणवले. एकूण ३० मुले या कार्यक्रमात सहभागी झाली. अकादमी व येथील मुलांचा वयोगट समान असल्यामुळे प्रस्तुतीनंतरच्या प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये साधारण तेच प्रश्न पुढे आले. यथील मुलांची एकाग्र होण्याची क्षमता शाळेतील मुलांपेक्षा कमी आहे हे मात्र जाणवले. मुलांना संगीताचे कुतूहल अवश्य होते, पण ३०-४० मिनिटे स्थिर बसणे बहुतेकांना जमत नव्हते. आगामी काळात इथे संगीताचे कार्यक्रम होत राहिले, की मुलांची ती क्षमता हळूहळू वाढेल व ह्याचा त्यांना विद्यार्थी म्हणून अस्भ्यासात व पुढे देखील भरपूर उपयोग होईल, अशी खात्री वाटते.
दीप गृह अकादमी मधील दोन शिक्षिका मूळच्या वाराणसीच्या. त्यांनी विशेष भेटून आम्हाला सांगितले, की पुण्यात आणि विशेषतः इथे आल्यापासून चांगले संगीत ऐकायला मिळणे दुरापास्त झाले आहे. ‘बैठक’ च्या माध्यामातून ४-६ आठवड्यातून एकदा का होईना, चांगले कलाकार ऐकायला मिळतात ह्याचे त्यांना विशेष अप्रूप होते. त्यांनी अशी खंत व्यक्त केली, की मुख्य शहरापासून लांब असल्याने चांगले संगीत शिक्षक मिळणे शाळेला अवघड होत आहे. संगीत शिक्षक असतील, तर मुलांना शास्त्रीय संगीतात रस उत्पन्न होईल, प्रस्तुत कार्यक्रम ते अधिक समजून-उमजून ऐकू शकतील, त्यांचा संयम वाढेल, व बौद्धिक प्रगतीला देखील चालना मिळेल असे त्यांनी नमूद केले.
हा उपक्रम निर्विवादपणे स्तुत्य आहे. या माध्यमातून शास्त्रीय संगीत व त्याचे महत्व, त्याची रस-हानी न होता मुले व शिक्षकांपर्यंत पोहोचत आहे. असे उपक्रम सातत्याने केले गेल्यास पुढील पिढीमध्ये अनेक सकारात्मक बदल त्यांच्या लहान वयापासूनच घडतील याबाबत शंका नाही! बैठक फौंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
– अपूर्व पेटकर
(अपूर्वने या उपक्रमासाठी स्वयंसेवेद्वारे ‘बैठक’ला सहकार्य केले)
Leave a Reply