कुमारस्मृती पुष्प ५

सात वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर कुमारांचे पुण्यात आगमन झालेले होते. अत्यंत जीवावरच्या दुखण्यातून बरे होऊन कुमार आमच्यात परत आले होते. त्यामुळे सर्वांच्या आनंदाला जणू उधाण आले होते. कुमारांना भेटायला सर्व ज्येष्ठ आणि कनिष्ठ कलाकार धावले होते. आणि हा आपला आनंद व्यक्त करण्यासाठी त्या श्रेष्ठ कलाकाराला मानाचा मुजरा म्हणून त्याच्यापुढे आपल्या कलेची हजेरी लावण्याचा कार्यक्रम सर्वानुमते ठरला. रविवारी संध्याकाळी कात्रे यांच्या क्लासात सर्व कलाकार व उत्कंठित श्रोते जमले. सर्व कलाकारांनी आपापल्या परीने कुमारांच्या समोर आपली कला मांडली. त्यात बी. डी. वाडीकर, भास्करराव जोशी, वसंतराव देशपांडे, मोहन कर्वे, खळीकर, इत्यादि बहुतेक कलाकार होते. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कार्यक्रम चालला होता. बहुतेक कलाकारांची हजेरी लावून झाली. आता कुमारांना गाण्याचा आग्रह करावा की नाही आणि करावा तर कोणी करावा व कसा याबद्दल चुळबुळ सुरु झाली. मी ते काम पत्करले आणि कुमारांना ‘थोडेसे गाणार का’ म्हणून विचारले. कुमारांनी मानेनेच नाही म्हणून सांगितले. श्रोते जरा नाराजच झाले होते. कुमार गात नाही या निराशेने श्रोते जिने उतरणार तोच लालजी म्हणाले, ‘कुमार, लोकांच्या चेहऱ्याकडे जरा बघ. काही तुमचे ऐकायला मिळेल या इच्छेने आले आहेत ते’. आणि कुमारांना काय वाटले कोणास ठाऊक, ‘घ्या, पेटी घ्या. लालजी धर ठेका.’ तंबोऱ्याची एक तार तुटली होती. तीन तारांचाच तंबोरा जुळवला व कुमार गायला बसले. सात वर्षांच्या अवर्षणानंतर हा मेघराज वर्षणार होता. सर्व जण कानात जीव आणून ऐकायला बसले होते. दक्षिणेकडील भिंतीजवळ बसलेली मंडळी उठून उभी राहिली होती. श्रोतृवृंदात पी.एल.ही होते. कुमारांनी तार सप्तकातला मर्मभेदी षड्ज लावला आणि सोहनी रागातील धनिसा॑रे॑रे॑सा॑निसा॑ हा स्वरसमूह घेतला. सर्वांना वाटले की कुमार आता सोहनी गाणार. पण लगेच कुमारांनी ‘मारुजी भूलो ना म्हाने’ या चिजेला सुरुवात केली आणि त्यातील भटियारचे मिश्रण स्पष्ट केले.

ठाणबंद असलेला एखादा घोडा बऱ्याच दिवसांनी मोकळा सोडावा म्हणजे प्रथम ज्या जोशाने धावतो, त्याप्रमाणे कुमारांचा वारू संगीतात संचार करायला निघाला होता. त्या चिजेतील ‘रो रो जागत सारी रतिया’ या चरणाने तर श्रोते वेडावून गेले होते. कुमारांनी सोहनी भटियारची रेकॉर्ड पुढे दिली, पण मला राहून-राहून वाटते की कुमारचे सोहनी भटियारचे त्या दिवशीचे रेकॉर्ड घेतले असते, तर उपलब्ध असलेल्या रेकॉर्डपेक्षा ते कितीतरी पटीने सरस असे लोकांना ऐकायला मिळाले असते. कुठे वाहवा द्यावी आणि कुठे नाही असे श्रोत्यांना झाले. श्रोत्यांची मान वाहवा देऊन तुटते की काय असे वाटायला लागले. शब्दांची ओढाताण नाही, द्विरुक्ती नाही. लयीची कृत्रिम कामगत नाही. सोहनी आणि भटियार यांचा सांधा कुठे जुळला जात आहे हे उमगत नव्हते, नव्हे उमगण्याच्या मनःस्थितीतच कोणी नव्हते. वाद्याचा कमकुवतपणा जाणवत नव्हता. कानांना ऐकू येत होता तो फक्त कुमारांचा स्वर. एखाद्या घारीने जमिनीवर झेपावून आपले भक्ष घेऊन आकाशात उंच भरारी मारावी, त्याप्रमाणे कुमारांनी अख्खी मैफलच आपल्या कवेत सामावून अंतराळात नेऊन ठेवली होती. त्या दिवशीसारखा सोहनी भटियार पुन्हा श्रोत्यांना ऐकायला मिळाला नाही याची सत्यता उपस्थित असलेले जाणकार निश्चित देतील.

वेळेचे भान कुणालाही नव्हते. सुमारे ४० मिनिटांनी कुमारांनी स्वर्गात नेलेले हे बैठकीचे विमान अलगद पुन्हा भूतलावर आणून ठेवले. गाणे संपल्यावर २-३ मिनिटे निःशब्द शांतता होती. वाहवा वगैरे शब्द कोणाच्याही मुखातून येत नव्हते. त्याच बैठकीत मी वसंतराव देशपांडे, पी. एल. इत्यादिकांची ओळख त्यांच्या विनंतीनुसार कुमारांशी करुन दिली. पुढे त्या सर्वांचा घनिष्ट संबंध येऊन ते कुमारांशी एकरुप होत गेले. पण कुमारांच्या आजारानंतर झालेली ती ४० मिनिटांची मैफल कित्येक कलाकारांच्या कलेला कलाटणी देऊन गेली हे खास.

सोहनी भटियारच्या त्या अविस्मरणीय मैफलीनंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी मी कुमारांना चहाचे निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे कुमार सकाळी ९ वाजता मंडईजवळच्या माझ्या माडीत आले. कुमार माझ्याकडे येणार हे कळले असल्यामुळे माझ्या बहुतेक सर्व विद्यार्थिनी माझ्या घरी सकाळपासूनच जमा झाल्या होत्या व कुमारांच्या स्वागतासाठी चाललेल्या माझ्या धावपळीत भाग घेत होत्या. त्यात कु. योगिनी, उषा वाटवे, सुशीला जोशी, सौ. सिंधू आगाशे, सौ. चंपूताई जोगळेकर इत्यादि सर्व आल्या होत्या. कुमारांच्या बरोबर कात्रे, लालजी इत्यादि स्नेही मंडळीही होती. पु. ल. देशपांडे, वामनराव देशपांडे इत्यादि सर्वांचीही त्या दिवशी उपस्थिती होती. आदल्या दिवशीच्या सोहनी भटियारने आमची झोप नाहीशी केली होती. खाणेपिणे वगैरे उरकल्यानंतर एखादे भजन म्हणून दाखवण्याबद्दल कुमारांना मी विनंती केली. आज मात्र त्यांनी आढेवेढे न घेता ती विनंती मान्य केली. रस्त्यावरील रहदारीचा त्रास होऊ नये म्हणून सर्व खिडक्या लावून घेतल्या आणि नुसत्या पेटीच्या स्वरावर कुमारांनी एकापाठोपाठ १०-१२ गाणी बंदिशींच्या स्वरुपात म्हणून दाखवली. त्यात ‘आज मुझे रघुवीर की सुध आयी’, ‘जमुना किनारे मेरा गाव’, इत्यादि अनेक भजने म्हटली. कु. योगिनीला थोडेसे भाषण करावेसे वाटले. ती थोडेसे बोलली व आदल्या रात्री झोप न आल्यामुळे तिला स्फुरलेले कुमारगंधर्वांवरील काव्य तिने वाचून दाखवले. कुमारांना हे असले काही आवडत नाही हे मला माहित असूनही मला काही विरोध करता येईना व ते जे काही घडेल ते मी निमूटपणे पाहत होतो. कुमारांना कोणी भरमसाट केलेली स्तुती मुळीच आवडत नाही. कोणी स्तुती करायला लागला तर त्याला तेथेच थांबवून त्या विषयाला कुमार कलाटणी देतात. दुसऱ्याची निंदा, स्वतःची स्तुती हे कुमारांचे नावडते विषय आहेत. बैठकीत अशा प्रकारची निंदा सुरु झाली की लगेच हा विषय कुमार थांबवतात व तंबोरे काढायला सांगतात. त्या दिवशीच्या त्या छोट्या कार्यक्रमानंतर सोमवार असल्यामुळे सगळ्यांनाच कामावर जायची घाई होती. पण त्या वातावरणाने भारावल्यामुळे बहुतेक सर्वांनी आपापल्या कार्यालयात रजेचे अर्ज पाठवले. मी शाळेत गेलो नाही व अवाक होऊन दिवसभर घरात बसूनच राहिलो.

श्री. वसंतराव देशपांडे, श्री. पु. ल. देशपांडे यांचा स्नेह कुमारांशी सारखा वाढतच गेला. श्री. वसंतराव, श्री. वाडीकरबुवा जणू कुमारांचे शिष्यत्व पत्करण्याच्या उद्योगाला लागले. श्री. पु. ल.नी संगीताची साधना केली नाही, पण मनाने मात्र ते कुमारांच्या फार जवळ गेले. त्यातच योगायोग असा की, इंदूरला एक संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पु. ल. गेले. तेथे रामूभैयांकडे कुमारांची भेट झाली. संमेलनानंतर रामूभैयांच्या अख्तरी मोटारीतून त्यांनी कुमार, गुळवणी यांच्याबरोबर उत्तर हिंदुस्थानात प्रवास केला व भरपूर मजा लुटली. पुण्याला आल्यावर आम्हाला सर्व हकिकत सांगितली व कुमारांना येत्या मे महिन्यात माझ्या बिऱ्हाडी एक महिनाभर मुक्काम टाकण्यासाठी बोलावले आहे अशी आनंदाची बातमी दिली. श्री. पु. ल.चे बिऱ्हाड त्यावेळी एस. पी. कॉलेजच्या मागे होते. कुमार ठरवल्याप्रमाणे मे महिन्यात सौ. भानुमतीसह आमच्यात आले आणि पु. ल.च्या बिऱ्हाडी कुमारांच्या सान्निध्याचा व संगीताचा जो मजा आम्ही सर्वांनी लुटला तो कुणालाही हेवा वाटण्यासारखाच होता.

कुमारांच्या सहवासात त्यांच्या बैठकीइतकाच मजा असते याची जाणीव सर्वांना पदोपदी होत होती. पु. ल.ची माडी दिवसभर सारखी गजबजलेलीच असायची. कोणी ना कोणीतरी असायचेच. मी, वसंतराव, वाडीकर जवळजवळ दिवसभर मुक्काम टाकूनच असू. कधी कधी आमचे जेवणखाणसुद्धा तेथेच होत असे. ‘आज ज्वारीची भाकरी आणि अंबाडीची भाजी आहे, जेवा इथेच’ म्हटले की आम्ही जेवायला बसत असू. सौ. सुनीता देशपांडे यांना दिवसभर सर्वांची सरबराई करावी लागे. कोकणमधून हापूस आंब्याच्या पेट्या भेट म्हणून येत. त्यात आम्हा सर्वांचा हिस्सा असे. त्या अखंड सहवासात खूप चर्चा रंगत. कधी कधी लहर लागली की चर्चेतून गाण्याचीच मैफल झडे. साधारणपणे दुपारची वामकुक्षी झाली की ४-४.३०च्या सुमारास दुपारच्या उकाड्यानंतर कुमार थंड पाण्याने स्नान करीत व नंतर तंबोरे मिळवायला सुरुवात होई व मैफलीची सुरुवात होई. त्या मैफलीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिवशी एखादाच राग घेऊन त्यांतील निरनिराळ्या तालांच्या चीजा कुमार गाऊन दाखवीत. त्यात ख्याल, त्रिताल, तराणे सर्व काही येत. अशा रितीने एका रागाचा जणू काही अभ्यासच सर्वांचा होई. निकटच्या जाणकार लोकांना याचा सुगावा लागल्यावर ४.३०-५च्या सुमारास सगळे हळूहळू जमत. त्यात श्री. मारुलकर, इनामदार, भीमसेन हेही काही वेळा असत. भीमसेन पी. एल.च्या बिऱ्हाडापासून एका हाकेच्या अंतरावरच, गोपाळ गायन समाजाच्या समोर रहात असत. अशा ज्या संध्याकाळी बैठकी झाल्या त्यातल्या भूप, गौडमल्हारच्या बैठकी विशेष लक्षात राहण्याजोग्या झाल्या.

पी. एल.नी कुमारांना दिलेल्या या आमंत्रणामुळे आम्हा लोकांचा खूप फायदा झाला. बऱ्याच चीजा आम्हाला कुमारांच्याकडून मिळाल्या. कुमार चीजा सांगायला तयार असत, पण त्या आम्ही तशाच म्हटल्या पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असे आणि आम्हालाही त्याचे महत्व पटले होते. कुमारांची ‘मारुजी भूलो ना म्हाने’ ही सोहनी भटियारची चीज एकदा ऐकून एका कलाकाराने चार-पाच दिवसांनी पुणे रेडिओवर गाऊन त्या चिजेचा सत्यानाश केलेला कुमारांच्या ऐकण्यात आला होता. कुमारांच्या या मुक्कामात त्यांना दररोज चहा-फराळाचे कुठले ना कुठले तरी आमंत्रण असे. कोणालाही नाही म्हणणे कुमारांना मोठे संकट वाटे व अशी सर्व आमंत्रणे जर स्वीकारली तर कुमारांची प्रकृती ठीक राहणार नाही असे वाटल्यावरून ही आमंत्रणे स्वीकारण्याचे काम पी. एल.ने स्वतःकडे घेतले आणि कुमारांच्या प्रकृतीचा अंदाज घेऊनच मोजकी आमंत्रणे स्वीकारली व कुमारांना त्या खाण्याच्या अत्याग्रहातून सोडविले.