कुमारस्मृती पुष्प ७

कुमारस्मृती पुष्प ७

याच सुमारास पी.एल.ने पुण्यातील आपले बिऱ्हाड हलविले व ते मुंबईला गेले. पुढे त्यांनी आपल्या निरनिराळ्या उद्योगांना सुरुवात केली आणि कुमारांचा सहवास लुटण्याचा आमचा एक आधारस्तंभच येथून हलला. ‘कुमारांचा मे महिन्यातील हा मुक्काम घडवून आणण्यात तुम्हा कलावंतांना कुमारांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवावे हाच माझा उद्देश होता’ असे पी.एल. माझ्याजवळ बोललेले मला आठवत आहे. त्यांना स्वतःला ते दर्शन माळवा, अलाहाबादच्या सफरीतच झालेले होते. त्या एक महिन्यात पी.एल.नी कुमारांसाठी अपार झीज सोसली हे आम्हा लोकांवर फार मोठे उपकार आहेत. पी.एल.च्या प्रस्थानाबरोबर कुमारही येथून हलले व देवासला गेले. त्या मे महिन्यातील गोड स्मृती आठविण्यात वसंतराव, मधू ठाणेदार, अप्पा इनामदार वगैरे आम्ही मंडळी बरेच दिवस मशगुल होतो. या गोड आठवणी नुसत्या आठवणीत न राहता पुन्हा अनुभवायला मिळाव्या असे सारखे वाटत होते, आणि पुढचा मे महिना जसजसा जवळ येऊ लागला तसतसे कुमारांच्या सहवासासाठी आसुसलेले आम्ही निरनिराळे बेत रचू लागलो. वसंतराव, पी.एल. इत्यादी मंडळी दूरदूर असली तरी पत्रव्यवहार करून काही तरी बेत आखीत होती. मी नोकरीत व शिकवण्यात बुडून गेलो असल्यामुळे प्रत्यक्ष काहीच करीत नव्हतो. कुमारांना काहीही करून पुढील मे महिन्यात पुण्यात आणावयाचे इत्यादी या लोकांचे बेत ऐकून मी आपल्या जागीच सुखावत होतो. संभाजी उद्यानाच्या पुढे मॉडर्न हायस्कूलच्या मागची बनकर बिल्डींग ही तेथील सरकारी कचेरी गेल्यामुळे बरीचशी रिकामी झाल्याचे या मंडळींना कळले. लगेच ती जागा मे महिन्यासाठी ताब्यात घ्यायचे ठरले. त्याप्रमाणे सर्व व्यवस्था झाली व त्या बिल्डिंगचा दुसरा मजला आमच्या उन्हाळी अधिवेशनासाठी मुक्रर झाला. कुमार सौ. भानुमतीसह बनकर बिल्डिंगमध्ये उतरले. वसंतराव सहकुटुंब आपले बिऱ्हाड सोडून तिकडे धावले. नागपूरहून श्री. नाना जोग ही या मेळाव्यात सामील झाले. पी.एल.ही सौ. सुनीताबाईंसह कुमारांना येऊन मिळाले. वरील सर्व मंडळींचे कुटुंब आटोपशीर असल्यामुळे तेथे राहू शकले, पण माझे कुटुंब आटोपशीर नसल्यामुळे फक्त मी स्वतः त्या मेळाव्यात जाऊन राहिलो. प्रशस्त जागा, निरनिराळी दालने, आवश्यक तेवढी शांतता, रहदारीची उत्तम सोय यामुळे हा एक महिन्याचा कालावधी म्हणजे आयुष्यातील एक रम्य आठवणींचा अमोल ठेवा ठरला असल्यास नवल नाही. त्या महिन्यात आम्ही महाबळेश्वरला सहल केली, कधी सर्वांनी मिळून सिनेमा पाहिला, कधी नुसतेच फिरलो, कधी विशिष्ट पदार्थांच्या भोजनाचे बेत आखले. पण हा झाला दैनंदिनीतला तपशील. ज्या मुख्य उद्देशाने आम्ही येथे एकत्र येत असू तो उद्देश मात्र कधी डोळ्याआड झाला नाही. संगीताशिवाय दुसरा कोणताच विषय गप्पांमध्ये  सहसा नसे. कधी कुमारांच्या अनुपस्थित दुसराच विषय चाललेला असला तर अचानक कुमार येऊन म्हणत ‘अरे वसंता, अरे भाई या गप्पा पुरे – चला, काढा तंबोरे’ आणि मग गायला सुरुवात होई. सकाळची वेळ असली तर सौ. भानुमती, वसंतराव, वाडीकर यांना कुमार काही शिकवायचे. त्या वेळी कुमार डग्गा घेऊन गाऊन दाखवायचे. कुमार डग्ग्यावर ठेका अत्यंत डौलदार, नखरेदार व वजनदार धरतात हे मला अनुभवायला मिळाले. एकदा सकाळी कुमार खूप रंगात येऊन कुकुभ बिलावल मधील ‘बना ब्याहन आयो’ ही झपतालमधील चीज कितीतरी वेळ शिकवत होते हे मला पूर्ण आठवते. निरनिराळ्या वेळेचे राग त्या त्या वेळेला कुमारांकडून ऐकायचे या गोष्टीचा सर्वांनी निदिध्यास घेतला होता व त्यासाठी त्यांना कसे प्रवृत्त करायचे हाच प्रयत्न प्रत्येकजण करीत असे. एका संध्याकाळी संपूर्ण मैफल भीमपलासची झाली. एकच भीमपलास राग, पण त्यातील विविध तालांमधील चिजा ऐकायला मिळाल्या. एकदा रात्री बागेश्री रागाचीच संपूर्ण मैफल झाली. एकदा यमन राग तर एकदा चंद्रकंस. एकदा तर फक्त भैरवीच्याच चिजा झाल्या. कुमार टेप रेकॉर्डर घेऊन आलेलेच होते, त्यामुळे सर्व टेप करून ठेवलेलेच असे. कुमार हे अत्यंत दिलखुलास अंतःकरणाचे कलावंत आहेत याचा एकदा प्रत्यय आला तो नमूद करणे उचित आहे. कुमारांची बागेश्रीची मैफल झाल्यानंतर माझ्याकडे शिकायला येत असलेल्या विद्यार्थिनींना मी म्हणालो, “कालची बागेश्रीची मैफल तुम्ही ऐकायला हवी होती. बागेश्रीचे इतके परिपूर्ण दर्शन मला कधीच घडले नाही.” सर्व विद्यार्थिनींना फार रुखरुख लागली व आम्हाला ती बागेश्री ऐकायला मिळणार नाही का, असे त्यांनी विचारले. त्यात योगिनी जोगळेकर, शांता निसळ, कुसुम डिस्कळकर, सुशीला जोशी, मंगला गौतम इ. विद्यार्थिनी होत्या. बागेश्रीची मैफल टेप करून ठेवलेली असल्यामुळे मी सर्व विद्यार्थिनींना घेऊन कुमारांकडे गेलो व त्यांना टेप लावायची विनंती केली. सर्व विद्यार्थिनी ते ऐकून डोलू लागल्या. त्यांची तन्मयता पाहून कुमारांना काय वाटले कोण जाणे, ते एकदम मला म्हणाले, “मी इथे असताना तुम्ही टेप कशाला लावता?” त्यांनी लगेच तंबोरे जुळवले आणि टेपमधील बागेश्रीतील सर्व चिजा तितक्याच तन्मयतेने गाऊन दाखविल्या. सर्व विद्यार्थिनी अगदी भारावून गेल्या होत्या. त्यातल्या एकदोघी तर तापाने आजारी होत्या. त्या म्हणाल्या, “सर! आज आमचा ताप पळाला!” कुमारांच्या वृत्तीतील हे औदार्य मी कधीही विसरणार नाही.

कुमारांचा मे महिन्यातील मुक्काम संपत आला आणि मग आम्हाला वाटू लागले की, पुणेकरांना आपण कुमारांचे काहीच ऐकवले नाही. बनकर बिल्डिंगमध्ये आवर्जून येऊन ऐकणारे श्रोते फारच थोडे होते. असे श्रोते हे कलाकार तरी असत किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असत. त्या काळात जर याची नोंद ठेवली असती तर फार बरे झाले असते असे आता वाटते. काही व्यक्ती आलेल्या अजून स्मरणात आहेत. श्री. चिंतामणराव व सौ. दुर्गाबाई देशमुख यांच्याकरिता तर कुमारांनी एका संध्याकाळी मुद्दाम मैफल भरवली होती. मध्यंतरी श्री. रामूभैया येऊन गेलेच होते. श्री. सुधीर फडके, दत्ता धर्माधिकारी, महादेवशात्री जोशी यांनीही आपली हजेरी लावली होती. एकदा रामदुर्गच्या राणीसाहेबांकरिता जीवन रेस्टॉरंटचे मालक श्री. पोटे यांनी एक मैफल घडवून आणली. झोपेचा काळ सोडून आम्हा सर्वांचा जागृतावस्थेतील अर्ध्यापेक्षाही जास्त काळ संगीत श्रवणात गेला असावा. कधी कुमार आवर्जून इतरांचेही ऐकत व टेप करून घेत. एके दिवशी श्री. वसंरावांच्या आग्रहावरुन सुरेशबाबूंकडून मिळालेली ‘सुगना बोले हमरी अटरिया हो रामा’ ही ठुमरी मी म्हटली व थोडीशी पेटी वाजवली. ते कुमारांनी टेप करून घेतले. एकदा श्री. मेहबूब खाँ यांचे स्वतंत्र तबलावादन कुमारांनी टेप करून घेतले. तबलावादन संपल्यावर त्यांच्या इरसाल भाषेत गप्पा सुरु झाल्या. त्याचेही टेप कुमारांनी गंमत म्हणून जोडून ठेवले. आपले रेकॉर्डिंग कसे झाले आहे या उत्सुकतेने मेहबूब साहेबांनी टेप ऐकवण्याची विनंती केली. जेव्हा कुमारांनी त्या इरसाल भाषणासह त्यांना ते रेकॉर्डिंग ऐकवले तेव्हा ते आ वासून पाहतच राहिले व म्हटले, “हे हो कशाला घेतलंत आमचं?”

बनकर बिल्डिंगमधील या मुक्कामाची फलश्रुति म्हणून एस. पी. कॉलेजमधील स्टूडेंट्स हॉलमध्ये एका रविवारी संध्याकाळी कुमारांचा कार्यक्रम करण्याचे ठरले. आम्ही सर्वांनी तिकिटे खपवली. त्यात वसंतराव देशपांडे, भीमसेन, अप्पा इनामदार, माझ्या काही विद्यार्थिनी अशा सगळ्यांनी भाग घेतला. कुमारांची ही बैठक ‘बेगी यार साईयाँ’ या मुलतानीतील ख्यालाने सुरु झाली. ह्या चिजेचे तोंड हे तार सप्तकात नेऊन टांगलेले आहे. त्यामुळे दर वेळेला श्रोत्यांकडून उत्स्फूर्त वाहवा हमखास येई. ह्या ख्यालानंतर कुमारांनी अत्यंत द्रुत लयीतील मुलतानीचा तराणा म्हटला. त्या दिवशी तबल्याच्या साथीला मधु ठाणेदार होते. तंबोऱ्याला सौ. भानुमती बसल्या होत्या. मध्यंतरानंतर बैठकीला चांगलाच रंग भरला. ‘सब सुर साधे’ या भीमपलासमधील चीजेने भीमपलासचे एक वेगळेच रूप श्रोत्यांना दिसले. सर्वसाधारणपणे रागाचे चलनवलन सप्तकाच्या ज्या विशिष्ट भागांत केले जाते त्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी नेऊन चिजेचा उठाव केला तर श्रोते ‘चमत्कृती’ वाटून अधिक दाद देतात व मैफल उत्तेजित होते हा कुमारांचा होरा अगदी अचूकपणे मी अनुभवला आहे. अशा काही हुकुमी चीजा कुमारांच्या पोतडीत आहेत की बैठकीत त्यांची मात्र श्रोत्यांना चाटवली की श्रोते सावधानतेने ऐकू लागतात. काही उदाहरणे म्हणून खालील चीजा ज्यांच्या स्मरणात असतील त्यांना याचा प्रत्यय येईल. सिंधुरामधील रुपक तालातील ‘ना दैया मै’, चंद्रकंसमधील ‘एरी पिया बिन’, सुघराईमधील ‘तोरे मिलवे को बीत गये जुगवा’, सोहनी भटियारमधील ‘मारुजी भूलो ना म्हाने’ किंवा सोहनीमधील ‘रंग ना डारो श्यामजी’ अशा अनेक जडीबुटीच्या मुळ्या कुमारांच्या संग्रही आहेत. श्री. वामनराव देशपांडे या कार्यक्रमाला हजर होते. या वर्ष-दोन वर्षांच्या काळात कुमारांनी जेवढी गाणी श्रोत्यांना ऐकवली त्या सर्व गाण्यांचा परिणाम म्हणजे त्यांचा असा एक श्रोतृवर्ग तयार झाला. प्रत्येक कलाकाराला आपला एक रसिकवर्ग तयार करावा लागतो. श्रोत्यांच्या आहारी न जाता, केवळ त्यांच्या फर्माइशी आहेत म्हणून त्याच त्याच चीजा न गाता, दर वेळेला काही तरी नवीन ऐकवून लोकांच्या बुद्धीला चालना मिळेल असे गाणे ऐकवून संगीताची समज खूप वरच्या दर्जाला आणण्याचे काम कुमारांनी केले व अजूनही त्यात खंड नाही.