अकल्पित योग – काही व्यक्ती अकल्पितपणे आपल्या जीवनात येतात व आपले जीवन उजळून टाकतात. त्याचप्रमाणे कुमारांच्या भेटीचा योग माझ्या आयुष्यात घडून आला. त्या दिवसापासून माझे सांगीतिक जीवन संपूर्णपणे बदलले व विचारांना निराळी दिशा लागली. त्या विचारांचा धागा अजूनही तुटत नाही.
मे महिन्याचे दिवस होते. १९४४ मधील ही गोष्ट आहे. माझ्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी होती. सुट्टीत मी नगर जिल्ह्यातील माझ्या खेडेगावी गेलो होतो. तेथे माझ्या निकटच्या आप्ताला त्यांची मुलगी विवाह जमवण्यासाठी पुण्याला एके ठिकाणी दाखवायला न्यायची होती. ज्यांची मुलगी होती ते गृहस्थ पाऊणशे वर्षाचे वृद्ध होते. मला पाहिल्यावर त्यांनी ती कामगिरी माझ्याकडे सोपवली. त्या मुलीला घेऊन मी पुण्याला परत आलो. संध्याकाळी लक्ष्मीरोडने फूटपाथवरून मी चाललो असताना सौ. माणिक वर्मा (त्यावेळच्या दादरकर) भेटल्या. मला पाहताच त्या म्हणाल्या की “कुमार उद्या माझे गाणे ऐकायला घरी येणार आहे. तुम्ही माझ्याकडे पेटीची साथ करायला आलात तर बरे होईल. काय गावे, कसे गावे हा मोठाच प्रश्न पडला आहे.” मी ‘येतो’ म्हणून कबूल केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी सौ. माणिक वर्मांकडे गेलो. त्यांच्याकडे तिसऱ्या मजल्यावर एक निवांत खोली आहे. त्या ठिकाणी बैठक घालण्यात आली. थोड्याच वेळात कुमार आपल्या मित्रमंडळींसह आले. त्यात श्री. रामूभैया दाते, तुळशीदास शर्मा, गणपतराव कात्रे, हर्षे, इत्यादि मंडळी होती. तिसऱ्या मजल्याचा जिना अगदी अरुंद असल्यामुळे ही सर्व मंडळी घुसळत घुसळतच वर आली. सुमारे तास – दिड तास सौ. माणिकचे गाणे झाले. बसक्या आवाजात श्री. रामूभैया प्रत्येक चांगल्या जागेला दाद देत होते. गाणे संपल्यावर रामूभैयांनी सर्वांची ओळख करून दिली आणि ‘आज रात्री जिमखान्यावर सुदर्शन बंगल्यात श्री. कुमारांचे गाणे ऐकायला या’ म्हणून आमंत्रण दिले. मला कुमारांच्या पेटीच्या साथीला बसण्यास सांगितले. तबल्याला श्री. लालजी गोखले होते. रात्री सौ. माणिक, त्यांच्या मातोश्री वगैरे सह आम्ही गेलो. गाण्याला सुरुवात झाली आणि आपण काही नवीनच ऐकत आहोत असे वाटू लागले. कुमारांनी कौशिक-कानडा सुरू केला होता. आतापर्यंत ऐकलेले गाणे ठराविक अशा साच्यातून बाहेर पडलेले होते. इथे पाहावे तर प्रत्येक सम वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व वेगळ्या आघातानी येत होती. शब्दांचे उच्चारण अत्यंत आवेशपूर्ण, लययुक्त व प्रत्येक स्वर हृदयाच्या गाभ्याला भिडणारा होता. ख्यालातील शब्दबंधातील हरकती-मुरकती अत्यंत स्पष्ट, व ख्यालातील लहानसहान स्वरसमूहाच्या तानासुद्धा मोत्याच्या लडीप्रमाणे ओघळत होत्या. समोरून दातेसाहेबांच्या वाहवांचा वर्षाव होत होता. मोजकी चाळीस-पन्नास मंडळी त्या मैफलीला होती. मी पेटीची साथ करताना अगदी चक्रावून गेलो होतो. न ऐकलेला राग, अदमास न लागणारी गाण्याची पद्धत, अत्यंत द्रुत लयीतील ताना यामुळे साथ करताना मी भांबावून गेलो होतो. ख्यालानंतर ‘काहे करत मोसे बरजोरी’ ही द्रुत त्रितालातील चीज कुमार गायले. या चिजेमध्ये तर कुमारांनी दाखवलेला लयीचा नानाविध आविष्कार दिपवून टाकीत होता.
चिजेचे शब्द निरनिराळ्या लयीत म्हणणे, एकच शब्द निरनिराळ्या स्वरसमूहामध्ये गुंफणे आणि त्या प्रत्येक कलाविष्काराला दातेसाहेबांच्या तीनपदरी आवाजातून उठलेली दाद यामुळे मैफलीला मयसभेचे रुप येऊ लागले. त्यानंतर गायलेल्या ‘मोरे आये’ या शहानातील झपतालामधील चिजेने मयसभेचे दुसरे दालन श्रोत्यांना दिसले. त्यानंतर मध्यंतर झाले. मध्यंतरानंतर ‘येरी पियाबिन’ ही झपतालामधील चंद्रकंसमधील चीज म्हटली. त्याला जोड म्हणून ‘जोबना रे ललैया’ हा द्रुत त्रिताल झाला. त्यानंतर दातेसाहेबांच्या फर्माइशीने कुमारांनी ‘प्रेम केले काय हा झाला गुन्हा’ हे भावगीत म्हटले. त्या भावगीताने त्या मैफलीला कुमारांनी जणू कळसच चढविला. शेवटी ‘नींदिया आई रे’ ही भैरवी झाली. भैरवीतील अनेक चिजा आतापर्यंत ऐकल्या, पण या भैरवीने एक स्वतंत्र घर माझ्या अंतःकरणात कोरुन ठेवले आहे.
आज त्या गोष्टीला तीस वर्षे झाली, पण त्या भैरवीची गोडी रतीभरही कमी झाली नाही. तीच भैरवी कुमारांच्या मैफलीत अनेकदा ऐकली, पण त्या दिवशी त्यात ज्या निरनिराळ्या कलाकृतीमध्ये ती गुंफली गेली तशी पुन्हा ऐकायला मिळाली नाही. मैफल संपली आणि धुंद मनाने मी, सौ. माणिक वर्मा, सौ. माई (माणिकच्या मातोश्री) असे सर्व निघालो. लकडी पूल येईपर्यंत कोणाच्याच तोंडातून शब्द निघाला नाही. सौ. माणिकने त्या शांततेचा भंग केला व म्हणाल्या, “मी आज सकाळीच गायले ते ठीक झाले. या मैफलीनंतर जर मला गायला सांगितले असते, तर गाण्याचे धाडस मला करता आले नसते.” कुमारांचे गाणे ऐकण्याची आम्हा सर्वांची ती पहिलीच वेळ होती. अजूनही ती मैफल नुकतीच ऐकल्यासारखी वाटते. तो दिवस माझ्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी लिहावयास हवा. संगीताकडे पाहण्याच्या नूरच पालटला त्या दिवसापासून.
एखाद्या मखमली पेटीत एखादा दागिना जतन करून ठेवावा त्याप्रमाणे त्या मैफलीची आठवण मी जतन करुन ठेवली आहे. माझ्या विषण्ण मनाच्या अवस्थेत त्या आठवणीने ताजेपणा मिळतो. कुमारांची ती सडसडीत बांध्याची मूर्ती, ती बैठकीला बसण्याची विशिष्ट ऐट, स्वरांच्या हेलकाव्याबरोबर मान हलवण्याची विशिष्ट लकब व समोर श्री. दाते बसलेले. एवढ्या गोष्टी आठवल्या की बाकी सर्व मैफल माझ्यापुढे साकार होऊ लागते. दाते साहेबांचा दाद देताना आवाज मंद्र-मध्य-तार या तिन्ही सप्तकांना स्पर्शून जाई. त्या दाद देण्यात एक प्रकारचा अभिमान दिसे आणि आसपासच्या श्रोत्यांना ‘उगाच नाही मी बेगम अख्तर आणि कुमार माझे श्वास-निश्वास आहे असे सांगत’ असा त्यातून भावार्थ प्रतीत होई. कुमारांच्या मैफलीला रामूभैया श्रोते लाभलेले दृश्य त्यानंतर चार-पाच वेळाच पाहायला मिळाले.