Baithak Foundation believes that music exposure and education are as important as mainstream education.

Since 2016, we are working towards creating a society with equitable music access and learning opportunities for children from the most marginalised communities.

कुमारस्मृती पुष्प ८

श्री. रामूभैय्या दाते यांच्या उपस्थितीत कुमारांचे गाणे ऐकणे यासारखी मजा दुसरी कोणती नसेल. श्री. रामूभैय्यांच्या उपस्थितीत मला एक असेच अपूर्व गाणे ऐकायला मिळाले. मैफलीला जर जाणकार व दिलखुलास अंतःकरणाचे श्रोते असतील तर त्या मैफलीत कलाकाराच्या कलाविष्काराचा अत्युच्च बिंदू आपणास अनुभवायला मिळतो. स्वच्छ मनाचे, घराण्याचा दुराभिमान न बाळगणारे जाणकार श्रोते ज्या मैफलीमध्ये असतील त्या मैफलीचे – श्रोत्यांचे – भाग्य फार मोठे असते, असे मी समजतो. मैफलीत असे श्रोते संख्येने जरी थोडे असले तरी ती मैफल ते उचलून धरतात. अशा श्रोत्यांना मी मैफलीची ‘खुलावट’च समजतो. काही कलाकारही असे विशुद्ध मनाचे श्रोते असतात व लहान कलाकारांच्याही अल्प-स्वल्प कलाकृतीला ते दाद देत असलेले मी पाहिले आहेत. पण काही कलाकार-श्रोत्यांच्या कपाळावरची आठी कधीही नाहीशी होत नाही व दुसरा कलाकार कितीही चांगला गात असला तरी त्याला मान हलवायचीच नाही अशा जणू निश्चयानेच ते बसलेले असतात. फक्त झोप आल्यामुळे त्यांची मान हलेल तेवढीच. अनेक मैफलींमध्ये असे काही विशुद्ध मनाचे कलाकार-श्रोते व रसिक-श्रोते माझ्या नजरेत भरले त्यांचा नामनिर्देश करावासा वाटतो. त्या यादीत श्री. रामूभैय्या दाते, श्री. वामनराव देशपांडे, श्री. बाळासाहेब अत्रे (पी. के. अत्रे यांचे बंधू), श्री. ना. र. मारुलकर, सौ. माणिक वर्मा, कु. प्रभा अत्रे, श्री. विठ्ठलराव कोरगावकर, सौ. हिराबाई, श्री. वसंतराव देशपांडे, श्री. पाटणकर (डॉक्टर) इत्यादी बरेच लोक आहेत. सर्वांचा नामनिर्देश करणे शक्य नाही. फक्त सर्वांना परिचित अशा काहींची नावे घेतली एवढेच.

श्री. रामूभैय्या दाते यांच्या उपस्थितीतल्या ह्या मैफलीचे वैशिष्ट्य म्हणजे तीन उत्कृष्ट कलावंत एके ठिकाणी ऐकायला मिळाले. आणि तेही खाजगी स्वरूपात. संगीत परिषदांमधून अनेक श्रेष्ठ कलाकार आपण ऐकतो पण ते स्वरूप खाजगी नसते. ही मैफल जिमखान्यावरील सुदर्शन बंगल्यातच आयोजित करण्यात आली होती. श्री. दातेसाहेब यांचे साडू श्री. गोडबोले त्या बंगल्यात राहत असत व त्यांच्याकडे काही मंगल समारंभ असल्यामुळे ही मैफल भरली होती. सौ. माणिक वर्मा, श्री. भीमसेन व श्री. कुमार असा बैठकीचा क्रम होता. सौ. माणिक वर्मांचे तंबोरे श्री. कुमारांनी जुळवून दिले होते. कुमारांना वंदन करूनच त्या गायला बसल्या. त्यांचा श्यामकल्याण फारच चांगला जमला होता. त्यानंतर एक ठुमरी म्हणून त्यांनी आपले गाणे संपवले. सर्व श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद एकसमयावच्छदे करून कशी असते ही त्या वेळी पाहायला मिळाली. श्री. दातेसाहेबांची तब्येत खुश होती.

श्री. भीमसेन तंबोरे मिळवू लागले. श्री. दातेसाहेबांच्या तोंडून उत्स्फूर्त उद्गार ऐकायला मिळाले, “आता दोन गानसिंह आपल्याला ऐकायला मिळणार आहेत”. श्री. भीमसेन त्या दिवशी मालकंस गायले. स्वराला असे काही वजन होते की, त्यांचा प्रत्येक स्वरालाप म्हणजे रत्नजडित सुवर्णपदक वाटत होता. मालकंस हा भीमसेन यांचा अत्यंत आवडता राग. त्यांनी गाजवलेल्या शेकडो मैफलीत या रागाची हजेरी सर्वात जास्त लागली असावी. ‘पग लागन दे’ हा ख्याल श्री. भीमसेन यांनी म्हटला. त्या दिवशी श्री. भीमसेन यांच्या गमकेच्या ताना अशा काही वजनाने गेल्या की लोडाला टेकलेले दातेसाहेब त्या वेळी ताठ बसून उठल्यासारखे करीत. एक तासाच्या मैफलीत मालकंस सगळीकडे भरून गेला होता.

त्यांच्या नंतर श्री. कुमार गायला बसले. औचित्य ओळखून कुमारांनी ख्यालावर ख्याल न काढता श्री. दातेसाहेबांच्या सूचनेप्रमाणे ‘काहे री ननंदिया मारे बोल’ या ठुमरीने सुरुवात केली. या ठुमरीची उठावणच मुळी लयीला झोके देत देत झाली आहे. चीजेचे शब्द व तालाचे बोल यांचा पाठशिवणीचा खेळ समेवर येईपर्यंत चाललेला या उठावणीत दिसतो. जंगला रागाचे स्वरूप हे मिश्र असल्यामुळे, स्वररचनेला यात भरपूर वाव आहे. ’काहे री ननंदिया मारे बोल’ या चरणातील एकच शब्द निरनिराळ्या स्वरगुच्छामध्ये गुंफून कुमार सादर करीत. सर्व शब्दांना एकाच वेळी निरनिराळ्या स्वरांचा साज चढवण्याचा बेडौलपणा त्यात मुळीच नव्हता. या ठुमरीवरूनच ‘संगीत स्वयंवर’मधील ‘करीन यदुमनी सदना’ हे पद तयार झाले व त्याला अमाप लोकप्रियता मिळाली हे विश्रुतच आहे. ठुमरीनंतर कुमारांनी मध्य मधीलच मीराबाईचे भजन म्हटले व मध्यमातीलच भैरवी म्हटली. या बैठकीत ‘मध्यमाचा रंग न मोडण्याची खबरदारी’ हे त्यांचे फार मोठे वैशिष्ट्य लक्षात आले. मध्यंतरानंतर तंबोरे मध्यम स्वरामध्ये मिळवले की कुमार ते कधीही पंचमात पुन्हा मिळवीत नाहीत ही गोष्ट जाणकार श्रोत्यांच्या सहज लक्षात येण्याजोगी आहे. नाहीतर पुष्कळदा पंचमातील तंबोरे मधेच मध्यममध्ये, पुन्हा पंचममध्ये, चंद्रकंस गायचा आहे म्हणून निषादमध्ये असे मिळवले जातात. सरड्याच्या रंगाप्रमाणे निरनिराळ्या रंगांचे वातावरण तयार होत गेले तर मैफलीवर कुठल्याच रंगाचा परिणामकारक ठसा उमटू शकत नाही ही होतकरू गायकांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्या दिवशीची एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पी. एल.ने कुमारांची पेटीची साथ फार उत्कृष्ट केली होती.

या पुष्पात उल्लेख झालेले राग-बंदिशी यांच्या links –

पं. भीमसेन जोशी – राग मालकंस – पग लागन दे

मीराबाई भजन – पियाजी म्हारे नैना आगे रहयो जी

नाट्यगीत – करीन यदुमानी सदना

ठुमरी – राग जंगला –  काहे री ननदिया