कुमार अत्यंत दुर्धर आजारातून बरे झाले आहेत म्हणून त्यांचा मोठा सत्कार करावा असे पुणेकर रसिकांना वाटले व त्या सत्काराची रूपरेषा तयार झाली. नूतन मराठी विद्यालयाचा असेम्ब्ली हॉल हे स्थळ त्याकरिता ठरवले व त्यासाठी तिकीट विक्री करण्यात सर्वांनी हिरीरीने भाग घेतला. खर्च वेच जाऊन कुमारांना सुमारे दोन हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. गोविंदराव टेंबे यांना देण्यात आले होते. त्यांना प्रकृती-अस्वास्थ्यामुळे मैफिलीला थांबता आले नाही. पण थोडा वेळ भाषण करून ते आपल्या निवासस्थानी गेले. सर्व असेम्ब्ली हॉल रसिक प्रेक्षकांनी नुसता फुलला होता. काही लोकांना जागेअभावी परत जावे लागले. त्यादिवशी श्री. बालगंधर्वांनाही श्रोत्यांमध्ये आणून बसवण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सौ. भानुमतीनी केली. मी हार्मोनियमच्या साथीला होतो व श्री.वसंतराव देशपांडे तबल्याच्या साथीला बसले होते. सौ. भानुमतीनी त्या दिवशी ‘का रे मेघा बरसत नाही’ ही मियामल्हार मधील चीज व नंतर एक भजन म्हटले. त्यांचा मियामल्हार त्या दिवशी छानच जमला होता. श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. नंतर श्री. कुमार गायला बसले. त्यांचे तंबोरे जुळायला वेळ लागला. स्वरात तंबोरे मिळवण्यासाठी किती काळजी घ्यावी लागते याची ज्यांना जाणीव होती ते कान देऊन तंबोरे मिळवण्याचाही आनंद घेत होते. वरवर गाणे ऐकणारे काही लोक चिडचिडत बाहेर जाऊन येत होते. तंबोरे समाधानकारक लागल्याशिवाय गायचे नाही हे कुमारांचे ब्रीद वाखाणण्यासारखे आहे. लोक फार चुळबुळ करीत आहेत असे दिसले की तंबोरे जवळपास स्वरात आणून बैठक गुंडाळणारेही कलाकार आपण पाहतोच. त्या दिवशी कुमारांनी स्वतः रचना केलेला लगनगंधार हा राग सुरु केला. लोकांना हे सगळे नवीनच. त्यात ह्या रागात कुमार गंधार स्वराचे तीन भेद दाखवीत होते. ‘सुध ना रही’ हे ख्यालाचे बोल होते आणि ‘बाजे रे मोरा झांझरवा’ हा त्याला जोड त्रिताल होता. या रागाचे छत इतके विलोभनीय तयार झाले होते की ते विसरणे शक्य नाही. जवळजवळ १। ते १।। तास हा ख्याल चाललेला होता पण त्यात कुठेही द्विरुक्ती होत नव्हती. आलापी करताना स्वर अत्यंत अचूक, लवचिक व अंतःकरण पिळवटून टाकणारे होते. या रागाचे एक स्वतंत्र वातावरण आहे. मन्द्र सप्तकातील धैवतावरुन जेंव्हा कुमार मध्य सप्तकातील कोमल गांधाराला (ध़ सा ग् ऽ) जाऊन भिडतात तेंव्हा हा राग मूळ धरु लागतो. असहायता व्यक्त करणे हा या रागाचा स्थायीभाव आणि त्या भावनेचा परिपोष गांधाराच्या चढउतारामध्ये सारखा होत असतो. गांधाराचे हे सूक्ष्म भेद ज्याच्या गळ्याला व स्वराच्या जाणीवेला टिपून घेता येतील आणि त्यातील सूक्ष्म तीव्रता दाखवून देता येईल, त्यालाच ह्या रागात प्रवेश करता येणे शक्य आहे. या गांधाराच्या चढउतारालाही एक शिस्त कुमारांनी घातलेली आहे. नुसत्या स्वरलेखनाने हा राग साकार करता येत नाही. हे स्वर ऐकताना श्रवणेंद्रियांची खरी कसोटी लागते. सप्तकातील शुद्ध-कोमल स्वर ज्यांच्या जाणीवेत कोरले गेले असतील त्यांनाच या गांधारातील सूक्ष्म भेदाचा आनंद घेता येतो. सामान्य श्रोत्याच्या डोक्यावरूनच हा राग जातो व सामान्य श्रवण अनेक वर्षे केलेले हे वृद्ध श्रोते या असामान्य श्रवणास असमर्थ ठरून ‘काय हो! या रागाला काही रूप आहे का?’ अशी विपरीत पृच्छा करतात. माझ्याजवळ ही पृच्छा पारंपरिक संगीत ऐकणाऱ्या अनेक वृद्ध श्रोत्यांनी केली आहे. त्यांना काहीच उत्तर मी दिले नाही. ‘त्यांना त्या रागाचे सौंदर्य आकलन करता आले नाही एवढीच शिक्षा पुरी आहे’ असे मनात म्हणून मी त्यांची कीव केली.
कुमारदेखील श्रोत्यांमधील जाणकारांचा अंदाज घेऊनच हा राग पेश करत असत. काही वेळेला हा अंदाज चुकतो असे मला वाटते. फार मोठ्या समुदायात त्या रागातील नाजुक नजाकत श्रोत्यांपर्यंत पोचू शकत नाही आणि मग श्रोते अस्वथ होऊ लागतात. मालवती, सहेली तोडी, बिहड भैरव, मधसुरजा अशी काही रागांची नावे या यादीत देता येतील. अत्यंत कलाकुसरीचे हे राग मोजक्या जाणकारांपुढेच गायले गेले तरच प्रभावी होऊ शकतात असे माझे वैयक्तिक मत आहे. या रागातील द्रुत चीजेत (बाजे रे मोरा झांझरवा) तर असहायतेचे निरनिराळे पदर उलगडूनच दाखवीत असत. त्या चीजेतील शब्द, स्वर व भावना जणू हातात हात घालूनच क्रीडा करीत होते. लयीचे विविध अंग या चिजेत ओतप्रोत भरलेले आहे. या चिजेतील गांधार हा अवरोहात जणू उतरत्या पायरीवरून सरसर उतरत असतो.
लगनगंधार नंतर कुमारांनी ‘छैलवा ना डारो गुलाल री’ ही भैरवी म्हटली. ह्या भैरवीने सर्व लोकांना कुमारांनी डोलावयास लावले. तार सप्तकातच ह्या चिजेची उठावण आहे. त्यात कुमारांचे नोकदार आणि हृदयस्पर्शी स्वर लागत असल्यामुळे ह्या चिजेमुळे श्रोत्यांना अब्दुल करीम खाच्या ‘जमुना के तीर’ ह्या भैरवीची आठवण होत होती. ‘छैलवा ना डारो गुलाल री’ या चिजेच्या तोंडावळ्याचे शब्द प्रत्येक वेळा निरनिराळ्या स्वरमालांमध्ये गुंफले जात होते. ‘गुलाल’ या शब्दावरील सम त्या शब्दाला स्पर्श करुन चेंडूप्रमाणे उडी घेऊन निरनिराळ्या ठिकाणी श्रोत्यांना अलगद नेऊन सोडीत होती. एक अभूतपूर्व कार्यक्रम ऐकल्याच्या आनंदात श्रोतुवर्ग परतला होता.
कुमारांच्या सत्काराला श्री. गोविंदराव टेंबे हे अध्यक्ष होते. पण कुमारांचे गाणे त्या सत्कारप्रसंगी ते ऐकू शकले नव्हते म्हणून त्यांच्या मुक्कामी (लॉ बुक डेपोचे श्री. खाडेकर यांच्या बिऱ्हाडी) जाऊन त्यांना गाणे ऐकवायचे कुमारांनी ठरवले. श्री. गोविंदराव टेंबे यांनी इंदोरच्या मुक्कामात कुमारांच्या लागोपाठ १०-१२ बैठकी ऐकून “कुमार गंधर्व हे एक मला पडलेले कोडे आहे” असे उद्गार त्यांच्या ‘माझा संगीत व्यासंग’ या पुस्तकात काढलेले आहेत. श्री. गोविंदरावांनी सत्कारप्रसंगी ‘मी तुमचे गाणे आज ऐकू शकत नाही’ अशा उद्गारात आपली हळहळ कुमारांच्या जवळ व्यक्त केली होती. त्या वेळी कुमारांनी ‘मी आपल्या घरी येऊन आपल्याला गाणे ऐकवीन’ असे कबूल केले होते. काही दिव्य अथवा अद्भुत असे ऐकले की त्याबद्दलचे अत्यंत कौतुक त्यांना असे. कुमारही सर्व ज्येष्ठ कलाकारांशी अत्यंत नम्रतेने व आदराने वागत असत. कुठेही एखादी चांगली चीज एखाद्या व्यक्तीजवळ आहे असे कळले की कुमार अत्यंत लीन होऊन त्या कलाकाराकडून ती घेत असत. श्री. रामकृष्णबुवा वझे यांचे शिष्य श्री. भास्कर जोशी यांच्याजवळ नारायणी रागात चांगली चीज आहे असे कुमारांना कोणीतरी सांगितले. लगेच कुमारांनी त्यांना घरी आणून ती चीज ऐकून ती आपल्या टेप रेकॉर्डरवर टेप करून घेतली हे मला माहित आहे. कुमारांच्या या विनम्र वृत्तीमुळे बडे गुलाम अली, रातंजनकर, रजब अली, राजाभैय्या पूछवाले इत्यादी अनेक कलाकारांनी आपला चिजांचा खजिना मुक्तहस्ताने कुमारांना दिला. कुमारांची ही निवडून पाखडून सर्व संग्रह करण्याची वृत्ति त्यांच्या निकट सहवासात आल्याशिवाय कळत नाही. देवासला कुमारांच्या निवासस्थानी जर आपण गेलो तर या सर्व संग्रहाचे दर्शन आपणाला होते. त्यांच्या संग्रहात आपणास अंबादास पखवाजियाचा पखवाज ऐकायला मिळेल. वृद्ध कलाकार जहांगीर खाँचा तबला ऐकायला मिळेल. त्यांच्या या संग्रही वृत्तीचा एक नमुना त्यांच्याच संवादातून मला कळला. असेच एकदा कुमार कुठल्या तरी संगीत परिषदेला प्रवासास निघाले होते. गाडीत त्यांच्याच डब्यात श्री. वाजिद अली हे होते. ते अलाहाबादला असत. कुमारांना संगीत परिषदेला जायला थोडा अवकाश होता. कुमार लगेच अलाहाबादला त्यांच्याच बरोबर उतरले व त्यांच्याकडे मुक्काम करून त्यांच्याजवळील काही निवडक व दुर्मिळ चिजा त्यांनी आत्मसात केल्या. त्या दुर्मिळ चिजा कुमारांनी श्री. मंगरूळकर यांच्या एकसष्टीनिमित्त केलेल्या गाण्याच्या कार्यक्रमात म्हणून दाखवल्या होत्या. त्या रसिक पुणेकरांच्या आठवणीत असतीलच.
गोविंदरावांसाठी म्हणून आयोजित केलेल्या बैठकीला फक्त १५-२० जाणकार मंडळी उपस्थित होती. अत्यंत खाजगी स्वरूपाची ही बैठक असल्यामुळे कोणालाही तिची चाहूल नव्हती. सकाळी नऊच्या सुमारास पेरूगेटजवळ खाडेकरांच्या बिऱ्हाडी तिसऱ्या मजल्यावर ही मैफल झाली. फक्त दोन सुरेल तंबोरे व वसंतरावांच्या लयबद्ध ठेक्यात ह्या गाण्याला सुरवात झाली. त्या दिवशी कुमारांनी सहेली तोडी व भवमत भैरव हे स्वतः तयार केलेले दोन राग म्हटले. सहेली तोडीमधील आलापी, ‘काहे रे जगावा’ हा ख्याल व जलद एकतालामध्ये निबद्ध असलेली ‘चंदा सा मुख बनडारा’ ह्या दोन चिजांमध्ये एक तास कसा संपला हे कळले नाही. गोविंदरावांची दाद हे एक मला विशेष आकर्षण वाटले. दाद देण्यामध्येसुद्धा काही सौंदर्य व कला असते हे मला त्या दिवशी पटले. गोविंदरावांना दाद देताना पाहण्यातसुद्धा एक वेगळाच आनंद होत होता. दाद देताना कलाकाराच्या कलाविष्काराबरोबर जो तन्मयतेने प्रवास करतो तोच उत्तम प्रकारे दाद देऊ शकतो. नुसत्या समेला इतर लोक मान हलवतात म्हणून आपणही मान हलवायची अशा प्रकारचे बहुसंख्य श्रोते आपण नेहमीच समाजात पाहतो. गोविंदराव दाद देताना त्यांच्या मान हलवण्यात एक विशिष्ट लकब असे. सहेली तोडी हे बिलासखानी तोडी सारखेच एक रागस्वरूप आहे. पण बिलासखानी तोडी न दिसता हा एक स्वतंत्र राग वाटत होता. त्याच प्रमाणे भवमत भैरव हा पुष्कळसा ललत रागाच्या तोंडावळ्याचाच, अत्यंत बिकट व वक्र आलापीने भरलेला असा राग कुमारांनी गायला.
गाणे संपल्यावर मी बराच वेळ तेथे बसून होतो. बैठक संपल्यावर किती तरी वेळ पान जमवता जमवता, पानाच्या शिरा काढीत काढीत कुमारांच्या सहेली तोडीची आठवण होऊन तोंडातून ‘वा!’ असा उद्गार वारंवार काढताना मी गोविंदरावांना पाहिले. एक जबरदस्त श्रेष्ठ श्रोता आज कुमारांच्या पुढ्यात बसलेला होता. त्यामुळे आज कुमार आपले सर्वस्व पणाला लावून गायले होते. कुमारांची कुठलीही आलापचारी अगर तानेची फिरत सामान्य स्तरावरची नव्हती. गोविंदरावांना अल्लादिया खाँमुळे लयीचे अतिशय वेड. त्यामुळे कुमारांच्या त्या गायकीत लयीचा अविष्कार वेगवेगळ्या डौलाने येत होता. फक्त दीड-दोन तासांची मैफल चिरस्मरणीय अशीच झाली.