कुमारांचा परिचय झाल्यानंतर दोन वर्षात त्यांचे गाणे भरपूर ऐकायला मिळाले व त्यांच्या गायकीने माझ्या मनात एक घरच निर्माण केले. कुमारांचे गाणे पचायला तसे फार जड आहे. निदान ५-६ मैफिली एकाग्रतेने ऐकाव्या लागतात तेंव्हा कोठे त्यातील मर्म समजू लागते. आणि मग इतर गाण्यातील फोलकट भाग कळू लागतो. नगरच्या आयुर्वेदाश्रमाधील कुमारांच्या गाण्याला माझ्या भावाला मी गावाहून बोलावून घेतले होते. नगरचे गाणे झाल्यानंतर मी परगावी माझ्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेलो व तो पुण्यास आला. पूर्वी मी मंडईजवळ राहात असे. ते दिवस गणपतीचे असल्यामुळे प्रत्येक चौकात गाण्याचे कार्यक्रम चालू होते. दुसऱ्याच दिवशी माझ्या घरापासून जवळच असलेल्या निंबाळकर तालीम चौकात एका प्रसिद्ध गायिकेचे गाणे होते. ते ऐकण्यासाठी माझा भाऊ गेला होता. पुण्यास परत आल्यानंतर मी भावाला त्या गायिकेचे गाणे कसे झाले म्हणून विचारले. त्यावर त्याने उत्तर दिले, “मी अर्धा तासापर्यंत गाणे ऐकण्याची खटपट केली, पण ते गाणे माझ्या कानात शिरेच ना. म्हणून मी शेवटी घरी येऊन झोपलो.” वास्तविक त्या गायिकेचे गाणे आवर्जून ऐकण्यासाठी तो जात असे, पण नगरच्या गाण्याने इतका जबरदस्त ठसा उमटवून ठेवला होता की त्याच्याही कानात दुसरे गाणे शिरेच ना. ही त्या वेळेपासूनची माझीही परिस्थिती अजूनही कायम आहे. कुमार येथे आले असताना त्यांना एका गायिकेने म्हटलेले पूर्ण आठवते आहे. ती म्हणाली की “कुमार, तुम्ही येता व गाऊन जाता. पण त्यानंतर महिनाभर तरी आमचे तंबोरे रियाजासाठी गवसणीतून बाहेर पडत नाहीत – हा केवढा तोटा होतो आमचा!”
मी बी.टी.साठी टिळक कॉलेज मध्ये जात असताना माझे एक मित्र संगीतामुळे निकट सहवासात आले होते. त्यांनी कलामंडळ या नावाने एक संगीत मंडळ काढले होते. त्यांनी माझ्या मध्यस्थीने कुमारांचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम मेहुणपुऱ्यातील रास्ते वाडयात झाला. माझ्या आग्रहामुळे कुमारांनी जयजयवंती म्हटला. कार्यक्रम चांगलाच झाला. पण प्रत्येक बैठकीत कुमार असे काही नवीन श्रोत्यांपुढे टाकतात की त्यांची स्मृती श्रोत्यांना अनेक दिवस पुरावी. त्याप्रमाणे या बैठकीत सादर केलेली मधुवंती आणि दोन मध्यम सलग घेऊन शुद्ध मध्यमावर सम ठेवलेली भैरवी श्रोते कधीही विसरू शकणार नाहीत. मधुवंती मधील ‘बैरन बरखा ऋत आई’ ही चीज अशी काही प्रभावपूर्ण मांडली की काही मरगळलेले श्रोते ताठ उठून बसले. मी मधुवंती राग हा प्रथमच त्या दिवशी ऐकला होता. ती चीज मी कुमारांकडून घेतलीच, नंतर मधुवंतीचा रियाज अनेक दिवस केला व त्या रागातील ८-१० चीजा निरनिराळ्या तोंडाच्या जमा केल्या. त्यानंतर ही मधुवंतीमधील चीज कुमारांच्या तोंडून पुन्हा फक्त एकदाच ऐकली. त्या दिवशीही आमचा होश असाच उडाला होता. पी.एल.च्या बिऱ्हाडी सकाळी ११ च्या सुमारास श्री. सुरेश हळदणकर, पंडितराव नगरकर, पी.एल. व मी होतो. सहज कुमारांनी या चिजेचे तोंड घेतले आणि आम्ही सरसावून बसलो असे दिसताच त्या चिजेचे तोंड असंख्य प्रकारे असे काही म्हटले की हळदणकर, नगरकर आ वासून पहातच राहिले. त्या पाठोपाठ ‘अनोखा लाडला’ ही दरबारी कानडामधील चीज म्हटली. ‘अनोखा लाडला’ एवढे दोनच शब्द इतक्या विविध लयीमध्ये म्हणून दाखवले की आजसुद्धा त्याची आठवण आली की शहारल्यासारखे होते. मधुवंतीवरुन वरील प्रसंग आठवला म्हणून येथे नमूद केला.
रास्ते वाड्यामध्ये कुमारांनी शेवटी म्हटलेली भैरवी म्हणजे कल्पकतेचा कळस होता. ती चीज म्हणजे एक हिंदीतील भावगीतच म्हणायला हवे. कुमारांनी नंतर खाजगी बैठकीत त्या भावगीताची पार्श्वभूमी समजावून दिल्यानंतर ती चीज कोरल्याप्रमाणे झाली. त्या चिजेची सुरुवात ‘पिया तोहे नैनन में राखूँ’ या शब्दांनी होती. एक प्रेयसी आपल्या प्रियकराला ‘आपले मीलन अशक्य आहे, तेव्हा मी तुला माझ्या डोळ्यात साठवून घेते आहे. आपल्या प्रीतीची वार्ता तू कोठेही बाहेर बोलू नकोस’ असे सांगते आहे, असा साधारण मथितार्थ त्या चिजेचा होता. अंतऱ्याचे तोंड मध्य षड्ज, पंचम व तार षड्ज हे स्वर घेऊन असे काही समेवर येई की ते तोंड पुन्हा पुन्हा कुमारांनी घ्यावे असे वाटे. त्या अंतऱ्याचे स्वरलेखन, माझ्या स्मृतीत जसे आहे ते, असे करता येईल –
भे ऽ टूँ ऽ स क ल अं ऽ ग ऽ साँ ऽ व ल ऽ को ऽ
प ऽ प ऽ सा सा सा सा॑ ऽ सा॑ ऽ ध ऽ नि् सा॑ ऽ नि सा॑
ती भैरवी पुन्हा कुमारांनी कधीही म्हटलेली मी ऐकली नाही. मी ती चीज मात्र कुमारांकडून घेतली व कधी कधी ती घरी म्हणून पाहतोही. ती भैरवी म्हणण्याचा आग्रह मी कुमारांना पुन्हा केला होता, पण त्यांनी तो नाकारला. आपल्याला आवडलेली एखादी चीज आपण दुसऱ्या एखाद्या बैठकीत म्हणण्याचा कुमारांना आग्रह जर केला आणि कुमारांना म्हणायची नसेल तर त्यांचे एक ठराविक उत्तर असे, “मी अशा जुन्याच चीजा जर पुन्हा पुन्हा ऐकवू लागलो तर माझ्या नवीन चिजा तुम्हाला केव्हा ऐकवणार?” या उत्तरावर आमचा आग्रह आम्हाला माघारी घ्यावा लागत असे. याच सुमारास भारत गायन समाजामध्ये कुमारांची एक मैफल झाली. दिवस उन्हाळ्याचे होते. सर्व मैफलच उकडून उकडून बेजार झाली होती. पण त्या दिवशी कुमारांनी गायलेली भूप रागातील ‘नू मन जोबन मानदा’ ही सिंधी भाषेतील चीज मैफलीवर आपला ठसा उमटवून गेली. त्या दिवशी श्री. लालजी गोखले व मी साथीला होतो.
१९४६ साली सरदार आबासाहेब मुजुमदार यांचा एकसष्ठी समारंभ मोठ्या प्रमाणात विजय थिएटरमध्ये (हल्लीचे टॉकीज) साजरा झाला. त्या निमित्त थिएटरमध्ये दररोज कलावंत आपली हजेरी लावत होते. माझ्या आठवणीप्रमाणे त्यात मल्लिकार्जुन मन्सूर, रविशंकरची सतार, मनहर बरवे, कुमार गंधर्व, मास्तर कृष्णराव, इत्यादि खूप कलावंत होते. सुमारे तीन-चार दिवस तरी रोज हे कार्यक्रम चाललेले मला आठवतात. परगावच्या सर्व कलावंतांची राहण्याची सोय बुधवार चौकाजवळच असलेल्या छाया लॉजमध्ये करण्यात आलेली होती. त्या ठिकाणी प्रो. बी. आर. देवधर आपल्या शिष्यगणांसोबत येऊन उतरले होते. जगन्नाथबुवा पुरोहितही विलायत खाँबरोबर आलेले होते. कुमार हा उदयोन्मुख गायक असल्यामुळे त्यांच्याकडून काहीतरी विशेष तयार करवून घ्यावे अशी श्री. देवधरांची इच्छा होती. त्यांनी ती इच्छा श्री. जगन्नाथबुवांजवळ बोलून दाखवली. त्यांनी ‘सुघर बर पायो’ ही चीज तयार केली. चंद्रकंस, मालकंस, कानडा यापासून काहीतरी नवीन कलाकृती करण्याची कल्पना होती. दोन गांधार, दोन निषाद, वक्र पंचम याप्रमाणे रचना करण्यात आली. कुमारच्या गळ्यावर ही चीज चढवण्याचा प्रयत्न झाला व हा ‘कौशी’ नावाचा एक प्रकार म्हणून संबोधण्यात आले. कुमारच्या गळ्यातून दोन्ही गांधार एकापुढे एक ठेवूनही साफ फिरत निघू लागली. त्याला जोड त्रिताल म्हणून ‘पीर पराई’ ही द्रुत चीज तयार करण्यात आली.
कुमारांचा रियाज झाला. कुमारांच्या हजेरीच्या वेळी ह्या दोन्ही चीजा पेश करण्याचे त्यांनी ठरवले. मला कुमारांनी ‘आज तुम्ही पुढे बसून माझे गाणे ऐका’ म्हणून सांगितले. मी श्रोतृवर्गात बसलो. कुमार रंगमंचावर आले. श्री. पांडुरंगशास्त्री देशपांडे यांनी प्रस्तावना केली. कुमारांची काळी शेरवानी व सडसडीत बांध्याची मूर्ति रसिकांना अभिवादन करून गाण्यास बसली. सुरुवातीलाच दोन गांधार सलग मींडेने घेऊन कुमार मध्य षड्जावर आले व शुद्ध गांधार घेऊन मध्यमावर स्थिर झाले. नंतर कोमल धैवत, शुद्ध निषाद व वक्र पंचम लावून पुन्हा दोन्ही गांधार मींडेने घेऊन परत मध्य षड्जावर आल्यावर असे काही वातावरण निर्माण झाले की प्रत्येक जण आतुरतेने आता आपल्याला काय ऐकायला मिळणार या उत्सुकतेने अधीर झाला होता.
‘सुघर बर पायो’ या चिजेमधील तोंड घेताना कुमार निरनिराळ्या प्रकारे, कधी शब्द तानेत गुंफून समेवर येत तर कधी सम दाखवून तिलाच कलाटणी देऊन दुसऱ्या स्वरावर नेऊन सोडीत. तानेचे लयदार सट्टे असे काही जोशात येत होते की, श्रोत्यांनी श्वासच रोखून धरावा. अत्यंत वक्र स्वरबंध त्या रागाच्या आरोहात आणि अवरोहात कुमारांनी दाखवले व त्या रागातील पंचम स्वराचे स्थान तर जणू काही शुक्राचा तारा मध्येच चमकावा त्याप्रमाणे दाखवले. तान अत्यंत बिकट, सफाईदार व बलपेचाची होती. स्वराला कुठेही यत्किंचितही न सोडून निरनिराळ्या स्वरांवर निरनिराळे आघात देऊन जणू काही इंद्रधनुष्याची शोभाच निर्माण केली. माझ्या समोर खुर्चीवर परगावचे दोन पागोटेवाले पाहुणे बसलेले होते. कुमारच्या आधीच्या कार्यक्रमाला ते गप्पा मारीत होते. मला फार त्रास होत होता त्यांचा. पण कुमारांचा कार्यक्रम सुरु झाला आणि ते चुपचाप झाले. कुमारांचा त्या दिवशीचा कौशी म्हणजे त्या तिन्ही दिवशी झडलेल्या मैफलीवर कळस चढवल्याप्रमाणे भासला. कौशी संपला त्यावेळी सर्व थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट किती तरी वेळ चालू होता. कौशीनंतर कुमारांनी ‘नही भेजे पतिया’ हे लोकगीत म्हटले. कुमारांचे गाणे संपल्यावर समोर बसलेल्या पागोटेवाल्यांचा आपापसात झालेला संवाद माझ्या कानावर पडला. ‘बाकी काही म्हणा, या मुलाने आपले कान पवित्र केले. आपले पैसे वसूल झाले.’
कुमारनंतर पुढील कार्यक्रम सुरु झाले आणि अर्धे पाऊण थिएटर रिकामे झाले. आबासाहेबांच्या या एकसष्टी समारंभाच्या गाण्याचे वृत्त त्यावेळी माझे मित्र श्री. मंगरूळकर हे वर्तमानपत्रात देत असत. कुमारांच्या त्या गाण्याचे वर्तमानपत्रात आलेल्या वृत्ताचे कात्रण श्री. मंगरूळकर यांनी जपून ठेवले आहे. मी मधून-मधून त्यांच्याकडे जाऊन कुतूहल म्हणून ते काढून वाचीत असतो. त्या दिवशी कुमारांनी कौशी ज्या रितीने मांडला त्या रितीने पुढे अनेक मैफलीत तो म्हटला असताही त्या रीतीने परिणामकारक झाला नाही. पुष्कळांनी ती चीज नंतर गायलेली माझ्या ऐकण्यात आली, पण ती अगदीच रूपहीन वाटली. असे वाटले की जणू ती चीज आणि तो राग खरा कुमारांसाठीच निर्माण झाला आहे. त्या रागातील पंचमच्या स्थानाचे विवेचन करताना त्यांना सुचलेली उपमा मोठी लक्षणीय वाटली. एखाद्या लहान मुलाने नाटकात काम करावे, सोंग सजलेले असावे, आणि त्या मुलाला तर उत्सुकता अशी की आपले आई-वडील आपले काम बघायला प्रेक्षकात येऊन बसले आहेत की नाहीत? तो हळूच चोरून पडदा व विंग यांच्या फटीतून प्रेक्षकांकडे पाहतो व कोणाचेतरी आपल्याकडे लक्ष गेले की लगेच तोंड आत घेतो तसा हा कौशीतला पंचम आहे!
कुमारांच्या सांगण्यात आले की, कुमारांच्या कौशीच्या कार्यक्रमानंतर सकाळच्या गाडीने मुंबईची सर्व कलाकार मंडळी एकाच डब्यातून मुंबईला गेली. त्यात कुमारही होते आणि मुंबईपर्यंत सर्व कलाकारांच्या चर्चेचा विषय कौशी आणि त्यातील पंचम हाच होता. त्या चिजेला इतकी प्रसिद्धी मिळाली की सर्वांनी तिच्याबद्दल (स्वरलेखनाबद्दल) व रागाबद्दल जगन्नाथबुवांजवळ विचारणा केली. जगन्नाथबुवांनी त्या चिजेला काहीतरी निश्चित स्वरूप पाहिजे व सर्वसामान्यांना गाता आले पाहिजे, त्यात फिरत करता आली पाहिजे म्हणून त्या चिजेचा राग जोगकंस ठरवून त्याचे स्वरलेखन करून ते संगीत कला विहार मासिकात छापूनही काढले. बुवांच्याकडेही पुष्कळ कलाकार ती चीज शिकले. अर्थात त्या चिजेच्या बंदिशीमध्ये अवरोहांत सलग शुद्ध गांधार, कोमल गांधार स्वरलेखनात घेतलेले नाहीत, त्यामुळे ज्या ज्या वेळी कुमार ही चीज गातात तेव्हा हे नवीन रूप शिकलेले कलाकार ‘कुमार चीज चुकीची गातात व रागही चुकत आहेत’ असे म्हणतात. नवीन शिकलेल्या कलाकारांच्या मते कुमारांची चीज ही जोगकंस होऊ शकत नाही.
ह्या बाबतीतला हा गैरसमज मी जेव्हा कुमारांच्या कानावर घातला तेव्हा कुमारांनी सांगितले, ‘लोक मला विचारायला येत नाहीत, पाठीमागे टीका करतात त्याला मी काय करू. त्या चिजेची सुरुवातच माझ्यापासून झाली आहे. मी ही चीज जोगकंस म्हणून गातच नाही. मी कौशी म्हणून ती गातो. कौशी हे एक अप्रसिद्ध रूप तयार केलेले आहे. त्या दोन्ही तऱ्हेच्या रूपांत काय फरक आहे व कोणते रूप परिणामकारक आहे हे फक्त जाणकारच जाणू शकतील. यापेक्षा जास्त विवेचन या चिजेबद्दल न केलेलेच बरे.’
मुजुमदार एकसष्टीच्या कार्यक्रमानंतर लौकरच कुमारांचा विवाह झाला व त्यानंतर लवकरच राजयक्ष्मा विकाराने आजारी ते पडले. त्यांचा विवाह देवधरांच्या स्कूल ऑफ इंडियन म्युझिकच्या जागेत झाला. त्यानंतर केडल रोडवर भागीरथी-निवास या इमारतीत त्यांनी स्वतंत्र फ्लॅट घेतला. कुमारांच्या आजाराची बातमी कळल्यावर मी त्यांना भेटण्यासाठी भागीरथी-निवासमध्ये गेलो. कुमार कॉटवर पडूनच होते. भेट झाल्यानंतरही आजाराबद्दल काहीही न बोलता गाण्याबद्दलच बोलू लागले. पडल्या पडल्याच डग्ग्यावर ठेका धरून मला ही भजनाची चाल कशी वाटते आहे असे विचारले, व ‘निसदिन बरसत नैन हमारे’ हे भजन ठेका धरून म्हणून दाखवले व त्याचे स्वर-लेखन लिहून घ्यायला सांगितले. ते अजूनही माझ्याजवळ आहे.
आजाराबद्दल मी जेव्हा विचारले तेव्हा ‘विशेष काही नाही, उगाचच लोक काहीतरी उठवतात. थोडीशी प्रकृती नादुरुस्त आहे एवढेच. लवकरच बरा होईन’ असे म्हणून त्या विषयाला कलाटणी दिली. मी पुण्याला परत आल्यानंतर कुमारांच्या आजाराने उग्र स्वरूप धारण केल्याचे कळले. त्यानंतर कोरड्या हवेत बरे वाटेल म्हणून रामूभैयांनी त्यांचे स्थलांतर घडवून आणले. मधून-अधून कुमारांच्या आजारबद्दल उलट-सुलट बातम्या पसरल्या जात. ते ५-६ वर्षे तरी अंथरुणाला खिळूनच होते. पुन्हा कुमारांचे गाणे केव्हा ऐकायला मिळेल या कल्पनेने मी तर अगदी आसुसलेला होतो. पण ५-७ वर्षात कुमारांची भेटही झाली नाही. फक्त स्मृतींच्या साहाय्याने त्यांच्या चिजा गुणगुणून पाहणे एवढ्यावरच समाधान मानणे भाग होते. कुमारांच्या ह्या दीर्घकालीन आजारानंतर सुमारे ५२-५३चे सुमारास कुमार बरे होऊन पुण्यास आल्याची वार्ता कळली व पुन्हा कुमारांचे गाणे ऐकायला मिळणार या कल्पनेने आम्ही पुणेकर उत्कंठित झालो.