उषा चिपलकट्टी

जेव्हा प्रेम सूरात न्हाऊन निघतं…

गाणं नेमकं आहे तरी काय? १२ सूरांनी आपल्याच मनातील भाव-भावनांचं रेखाटलेलं एक चित्र की एका ईश्वरी नादाच्या मागे भान हरपून जाण्याचा प्रवास? गाण्याची करावी तितकी व्याख्या ही थोडीच . कदाचित ती व्यक्तिसापेक्ष ही असेल . पण आमच्या उषाताई मात्र नेहमी एकच म्हणायच्या, …अगदी ठामपणे ….  ‘ गाणं म्हणजे प्रेम ’ आधी मनात प्रेम हवं तेव्हा कुठे गाण्याची सुरुवात होऊ शकते. आपल्या अंतःकरणातील प्रेम त्यांनी गाण्यावर अगदी ओवाळून टाकलं होतं. मुळात त्या स्वतःच गाणं झाल्या होत्या आणि म्हणून त्यांचं हे म्हणणं हे एक सामान्य विधान नसून त्यांच्या सांगीतिक अनुभूतीचं सार म्हणावं लागेल.


उषा चिपलकट्टी …. खरोखरच एक मनस्वी व्यक्तिमत्व. कलाकार ही काही मुळात ओळख नाही, विशेषण ही नाही, उपाधी ही नाही आणि उपलब्धता ही नाही. मुळात कलाकार ही एक वृत्ती आहे आणि ती वृत्ती उषाताईंच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य घटक होती. विद्या आणि कला ह्यातील एक साधा भेद जर बघायचा झाला तर लक्षात येईल की बुद्धीला आणि तर्काला संतुष्ट करून जी ग्रहण करता येते ती विद्या. कलेच्या बाबतीत मात्र अंतःकरण, उत्कटता आणि त्याची अभिव्यक्ती ह्या गोष्टी प्रमुख ठरतात. कलेचा उगम हाच मुळात भावभावनांच्या पोटी होतो आणि तिचा जन्म चित्र स्वरूपात कुणाच्या हाती, नृत्यस्वरूपात कुणाच्या देहबोलीत तर गाण्याच्या स्वरूपात कुण्याच्या ओठी होतो. उषाताईंच्या गाण्यातून वारंवार ह्याची प्रचिती येते.

उषाताईंचा जन्म पुण्यातीलच. मूळच्या त्या कानडी. लहानपणापासूनच त्यांचा गाण्याकडे ओढा होता. पुण्यातील तेव्हाचा काळ हा संगीताने भारलेलाच होता.

संगीताच्या प्रचार- प्रसाराकारीता पं. विष्णू दिगंबर पलुस्कर ह्यांनी जे कष्ट घेतले होते त्याचे पुरेपूर चीज पुण्यनगरी पुण्यात झालेच होते. गोपाल गायन समाज ही संस्था संगीत प्रचाराचे काम यथोचित पार पाडत होती. श्री. गोविंदराव देसाई हे तिथले प्रमुख. वयाच्या साधारण १० व्या वर्षी उषाताईंनी गोपाळ गायन समाज येथे श्री. अनंतराव मराठे ह्यांच्याकडे गाणं शिकायला सुरुवात केली. गाण्याप्रती त्यांना अचाट कुतूहल तर होतंच पण त्या वयात ही आपल्याला कुठलं गाणं आवडतंय आणि तेच आपल्याला शिकायचंय हा विचार ही त्यांच्या मनात स्पष्ट होता. कलेप्रती आसक्त असणारी त्यांची वृत्ती तिथे ही डोकं वर काढत होती.

काही महिने शिकल्यावर त्यांनी सरळ गोविंदराव देसाई ह्यांना मनातील घालमेल बोलून दाखवली. “ मला आऽऽ चं गाणं शिकायचंय. तरच मी गाणं शिकेन.” शास्त्रीय संगीत वगैरे हा विचार ही १० व्या वर्षी उषाताईंच्या डोक्यात नव्हता मात्र त्या संगीताची नकळत मोहिनी त्यांना पडली होती. एक १० वर्षाची पोर असं म्हणतेय बघितल्यावर गोविंदरावांनी उषाताईंना मोठ्या मुलींच्या वर्गात बसण्याची परवानगी दिली. सुरुवातीला फक्त ऐकण्याकरिता आणि त्यानंतर उषाताई त्याच वर्गात शिकू लागल्या आणि तिथून त्यांच्या ख्याल संगीताच्या शिक्षणाचा प्रारंभ झाला. गोविंदरावांनी फार मनापासून उषाताईंना धडे दिलेत. ख्याल शिकविताना तालाचं महत्व पटवून देत डग्ग्यावर ठेका धरायला ही शिकवलं.

ग्वाल्हेर परंपरेचं बीज उषाताईंच्या मनात रुजवल्या जात होतं आणि सोबतच त्यांच्या मनस्वी वृत्तीने त्या ही त्यांच्या गाण्यातून अभिव्यक्त होऊ लागल्या. पुढे काही दिवस तिथलेच श्री. यशवंतराव मराठे ह्यांच्याकडे ही उषाताई शिकल्या. आणि त्यानंतर दीर्घकाळ त्या श्री. विठ्ठलराव सरदेशमुख ह्यांच्याकडे शिकू लागल्या.


विठ्ठलराव हे मुळात किराणा घराण्याचे . किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खान साहेब ह्यांचे सुपुत्र श्री. सुरेशबाबू माने ह्याची ते शिष्य. विख्यात संवादिनी वादक म्हणून त्यांची ओळख होतीच. विठ्ठलरावांकडे शिकताना उषाताईंच्या प्रतिभेला वेगवेगळे पैलू पडू लागले. त्यांच्या प्रतिभेला व्यक्त होण्याची एक नवी वाट सापडू लागली. ख्यालाबरोबरच काही उपशास्त्रीय, गझल ह्या गोष्टींकडे ही उषाताईंचा कल होताच. विठ्ठलरावांकडे असताना निरनिराळ्या रचना, विचार, सौंदर्यदृष्टी त्या आत्मसात करू लागल्या. निसर्गाशी नातं जोडत विठ्ठलराव उषाताईंना शिकवत होते. पठडीतलं शिक्षण नव्हतच ते. उषाताईंचं मन तिथे तयार होत होतं. काही काळ उषाताई प्रल्हादबुवा जोशी ह्यांच्याकडे ठुमरी ही शिकल्या होत्या. ठुमरी, चैती, कजरी, झुला, फाग ह्या गानप्रकारांवर ही उषाताईंचा खूप जीव होता आणि अत्यंत तयारीने, नजाकतीने त्या हे प्रकार सादर देखील करत. कधीतरी बाबुराव विठ्ठलरावांकडे यायचे, त्यांच्याकडून ही उषाताईंना मोलाचं मार्गदर्शन मिळत.

ग्वाल्हेरची परंपरा अंगी अगदी बाणली असताना उषाताईंवर हे जे नवीन संस्कार होत होते ह्यामुळे त्यांची प्रतिभा आणि सौंदर्य दृष्टी ह्याची झेप आणखीच धाव घेत होती. किराणा घराण्याचा अगदी जिव्हाळ्याचा असा राग शुद्ध कल्याण हा गाताना तर उषाताई विशेष भावूक होत. ‘ तुम बिन कौन खबर ले ’, ‘ माैंदर बाजो ’, ‘ रस भिन भिन आज ’ ह्या चीजा उषाताई अगदी शेवट पर्यंत तितक्याच प्रेमाने गात होत्या आणि त्यातील प्रेम कधीच आटत नव्हतं. दिवसेंदिवस वाढतच होतं. कधीतरी इच्छा झाली की अगदी खास शैलीत बाबूरावांची ‘बान नैनो का जालीम है ‘ ही गझल देखील अगदी आवडीने त्या पेश करत. मुळात त्यांची वृत्तीच अत्यंत रसिक होती. शरीराच्या व्याधी , वय ह्या गोष्टींनी त्यांच्या मनावर कधीच कुरघोडी केली नाही. जे लोकांना दिसत नाही असं सगळं सौंदर्य त्या त्यांच्या गाण्यात व्यक्त करत राहिल्या. निसर्गातील सौंदर्य, नवजात शिशूची निरागसता, आईच्या हृदयातील माया, दोन जीवांमधील संवादापलीकडचे प्रेम, भक्त आणि परमेश्वरातील माधुराद्वैत ह्या सगळ्या भावभावनांचा आविष्कार हा कायम त्यांच्या गाण्यात होतच राहिला. अगदी शेवट पर्यंत. डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांनी देखील उषाताईंना मोलाचे मार्गदर्शन केले. उषाताईंनी विद्येचा ध्यास कधीच सोडला नाही. अगदी शेवटच्या काळात देखील एखादी गोष्ट जर त्यांना अडली तर ती सुटेपर्यंत त्याचा मागोवा त्या घेत.

Rahul Deshpande · Audioblog 20 (Season 2) Guruji Part 2


उषाताईंच्या सांगीतिक प्रवासातील एक अत्यंत महत्वाचं पर्व म्हणजे पंडित कुमार गंधर्व ह्यांच्या गायकीचा त्यांच्यावर असलेला सखोल परिणाम. मुळात ते गाणंच विलक्षण. पुण्यात कुमारजी श्री. मंगरुळकर ह्यांच्याकडे नेहमी यायचेत. मंगरुळकरांचा आणि उषाताईंचा फार चांगला घरोबा होता. कुमारजी आलेत की ते हमखास उषाताईंना त्यांच्याकडे बोलवत आणि अशा रितीने अनेक अनौपचारिक मैफिली दरम्यान उषाताईंना कुमार्जींकडून अत्यंत मोलाचे मार्गदर्शन मिळाले. कुमारजींच्या गाण्याने उषाताईंना जणू व्यापून टाकले होते. ‘गोविंद बीन बजाई’ हा राग नंदमधला अनवट ख्याल कुमारजी फार आवडीने गात. एकदा अगदी अनौपचारिक भेटी दरम्यान श्री. मंगरुळकर ह्यांकडे उषाताईंनी त्यांना तो ख्याल विचारला. कुमारजी म्हणले, ‘ उषा , मी तीन वेळा हा ख्याल म्हणेन. दोन दा ऐक आणि तिसऱ्यांदा मनात म्हण. चौथ्यांदा जसाच्या तसा नाही म्हणलीस तर पुन्हा गाणं म्हणून माझ्यापुढे उभी होऊ नकोस.’ उषाताईंची परीक्षाच होती. पण गाण्यावरील निस्सीम प्रेम, गुरूंवरची श्रद्धा आणि निष्ठा हे ताईंबरोबर कायमच होतं. आणि ताईंनी चौथ्यांदा जसाच्या तसा तो ख्याल म्हणून दाखवला, अगदी तसाच. सगळ्यांनाच फार आनंद झाला. कुमारजी ही फार खूष झाले. मनभरून आशीर्वाद दिले. पुढे ही ताईंना वेळोवेळी कुमारजींचं मार्गदर्शन मिळत राहिलं. त्यांचा विचार उषाताईंनी त्यांच्या गाण्यात नेहमीच उतरवला. त्यांच्या प्रतिभासंपन्न गायकीला आता तितकंच अनमोल असं कोंदण मिळालं होतं. पुढे उषाताईंनी ही ज्या स्वतःच्या रचना केल्यात त्यात कुमारजींच्या विचारांचा भास होत असे. काही रचना तर अशा आहेत की वाटतं की कुमाराजींच्याच आहेत की काय. त्या कुमारमयच झाल्या होत्या. नानाविध चीजा, झुला, फाग, भजनं अशा अनेक रचना त्यांनी केल्या.

उषाताई वयाच्या १८ व्या वर्षापासून ते ८० व्या वर्षापर्यंत ‘ऑल इंडिया रेडीओ’ साठी गायल्या. त्याच दरम्यान विविध समारोह, सभा येथे त्यांचं गाणं होत राहिलं. १९७१ साली पुण्यातील प्रतिष्ठित अशा सवाई गंधर्व संगीत महोत्सवात देखील त्यांचे गायन त्यांनी प्रस्तुत केले. गाण्याबरोबरच त्यांनी विद्यार्थी देखील घडवलेत. आजचे आघाडीचे गायक श्री. राहुल देशपांडे ह्यांना घडविण्यात उषाताईंचा मोलाचा वाटा आहे. हे सगळे करीत असताना स्वतःमधील विद्यार्थी त्यांनी नेहमी जिवंत ठेवला. गाण्यावरचं प्रेम, लोभ अगदी तितकाच उत्कट ठेवला. उषाताईंसारखे एक संगीतमय व्यक्तिमत्व आज बघायला मिळणे खरोखरीच दुर्मिळ. सगळा जीव त्यांचा गाण्यातच होता. छान सूर कानावर पडले की भावविभोर होणारं त्यांचं मन, ओल्या झालेल्या डोळ्यांच्या कडा आणि अंतःकरणातील आनंदाचं चेहऱ्यावर उमटलेलं गोड प्रतिबिंब हे खरोखर विलक्षण होतं. त्यांच्या गाण्यात अचूक सुरेली होती, अगदी एका सूक्ष्म बिंदू प्रमाणे प्रत्येक सुराची जागा त्यांच्या गळ्यात पक्की होती. त्या स्वरांवर त्यांनी फार माया केली, अगदी बेभान होऊन. ‘ स्वरावर खूप प्रेम करा. अगदी स्वतःला विसरून. इतकं प्रेम करा की तुमचं अस्तित्व विसरून तुम्ही स्वतः स्वर होऊन जाल’ असं त्या नेहमी म्हणत. संगीताच्या उत्पत्तीचं कारण त्यांना कळलं होतं. गाणं म्हणजे नेमकं काय ह्याची अनुभूती त्यांना मिळाली होती आणि तो आनंद घेण्यात आणि इतरांना देण्यात त्यांनी नेहमीच धन्यता मानली. खुद्द प्रेमाला ही हेवा वाटावा इतकं प्रेम उषाताईंनी स्वरावर केलं आणि ते करीत असतानाच त्या त्यातच विलीन होऊन गेल्या…अगदी अलगदपणे ….पण स्वतःच्या सुरांची आस ह्या पृथ्वीतलावर जिवंत ठेवत.

About the curator:

Alhad Alsi:

We are listening! 

Do you have an anecdote or a story or any archival recordings of Ushataai Chipalkatti which you would like to share? We are all ears! 

All the recordings have been compiled from the web. In case you feel proper credit has not been given, please reach out to us!

Please drop a comment below or write to us at baithakcommunity[at]gmail[dot]com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *