कुमारांच्या चाहत्या वर्गात श्री. अप्पासाहेब इनामदार हे एक प्रमुख होते. श्री. वसंतराव देशपांडे, श्री. बी. डी. वाडीकर हे तर कुमारांच्या गायकीकडे संपूर्णपणे आकर्षिले गेले होते. श्री. वाडीकर यांनी तर शिष्यत्वच पत्करले होते व ते बरेच दिवस देवासला जाऊन राहिले होते. परंतु पुढे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांना देवास सोडावे लागले व ते पुन्हा पुण्यास येऊन स्थायिक झाले. श्री. वसंतराव देशपांडे, वसुंधरा श्रीखंडे (कुमारजींशी लग्न होण्याआधीच्या) देवासला जाऊन महिना महिना रहात असत व कुमारांच्या सहवासाचा व संगीताचा आस्वाद घेऊन व काही थोडेसे शिकून येत असत. श्री. वसंतरावांच्या गायकीवर कुमारांच्या गायकीचा खूपच असर झालेला श्रोत्यांना अनुभवायला मिळतो. कुमारांचे कार्यक्रम पुण्यात वारंवार घडून यावेत यासाठी आम्हा सर्व मंडळींची खूप धडपड चाले. श्री. अप्पासाहेब इनामदार यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम घडवून आणण्यात फार मोठा भाग घेतला. असाच एक कार्यक्रम त्यांनी ‘आदर्श विद्यालयात’ आयोजित केला होता व आम्ही सर्वांनी त्याची तिकीटविक्री केली. श्री. कुमार हे सौ. भानुमतीसह येथे आले होते. आदर्श विद्यालयाची जागा कार्यक्रमाला अपुरी पडली व शेवटी पुष्कळ श्रोत्यांसाठी आम्हाला विद्यालयाच्या पटांगणात बैठकी घालून त्यांची सोय करावी लागली. सर्व हॉल जाणत्या श्रोत्यांनी भरून गेला होता. कुमारांचे चाहते सहकुटुंब सहपरिवार तिकिटे काढून आले होते. श्री. मधुसूदन कानेटकरांच्या घरातली १० मंडळी आलेली मला माहिती आहे. जीवन रेस्टॉरंटचे मालक श्री. पोटे यांनी २०-२५ तिकिटे खपवली व रामदुर्गच्या राणी व इतर बरीच स्नेहीमंडळी त्यांनी आणली होती. माझ्या सर्व विद्यार्थिनी बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थित होत्या. अशी कितीतरी स्नेहीमंडळी आली असतील जी आत्ता स्मरत नाहीत.
त्या दिवशी श्री. वसंतराव देशपांडे तबल्याच्या साथीला होते. सौ. भानुमती पाठीमागे तंबोऱ्याला बसल्या होत्या. त्या दिवशी कुमारांनी भूप रागातील त्यांनी तयार केलेला ‘ध्यान अब दिज्यो’ हा धीम्या त्रितालामधील ख्याल म्हटला. ह्या ख्यालाची बांधणी इतकी रेखीव आहे की, त्यातील सर्व अक्षरे कोरून महिरपीत बसवल्याप्रमाणे वाटतात व त्यात कुठेही यत्किंचित फरक झाला की समेचा गोंधळ उडतो. भूप रागाचे मूर्तिमंत दर्शन या ख्यालात घडते. भूप राग हा देसकार, शुद्ध कल्याण या रागांना वेगळे ठेवून गाण्यात फार कौशल्य आहे. नुसत्या आरोह-अवरोहावरून हा राग गाता येत नाही. त्यातील गांधार, पंचम, धैवत यांची संगती फारच चातुर्याने करावी लागते. ज्यांना भूप रागाचा अभ्यास करावयाचा असेल त्यांनी ही बंदिश जर काळजीपूर्वक तपासली तर त्यांना भूप गाणे ही एक चिंतनाची गोष्ट निश्चित वाटेल. मध्यंतरानंतर कुमारांनी बिहागडा रागातील ’सकल बन भेजी’ हा स्वरचित ख्याल म्हटला. त्याला जोड म्हणून जगन्नाथबुवा पुरोहितांनी रचलेली एकतालामधील ‘सखी मंदरवा में’ ही चीज म्हटली. ह्या चिजेत बिहागडामधील स्वरलालित्य ओतप्रोत भरले आहे. कुमारांचा आवाज अत्यंत निकोप होता. त्यानंतर कौशी रागातील त्यांनी लोकप्रिय केलेला ‘सुघर बर पायो’ हा ख्याल म्हटला. ह्या रागातील तानांची फिरत अत्यंत बिकट आहे व दोन गांधार सतत उतरत्या क्रमाने अत्यंत द्रुत लयीत खटक्याने घेण्याचे काम कुमारच करू जाणे. त्या दिवशी सौ. भानुमतींनी कुमारांची ही बिकट फिरत इतकी सही-सही व आवेशाने घेतली की, एखादी वीज चमकून जावी त्याप्रमाणे ती बिकट तान त्यांच्या गळ्यातून गेली व त्या तानेला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. कुमारांना त्या दिवशी किती गाऊ आणि किती नाही असे झाले.
मैफल सुरु होऊन तीन तास होऊन गेले होते. कुमार गाणे आवरणार नाहीत हे पाहिल्यावर सौ. भानुमती अस्वस्थ झाल्या होत्या. कारण कुमारांना २-२.५ तासापेक्षा जास्त गावयाचे नाही अशी सूचना डॉक्टरांनी दिलेली होती. सौ. भानुमतींनी तंबोऱ्याला दुसऱ्या कोणाला तरी बसवले व त्या स्वतः बाजूला गेल्या व तेथून त्यांनी कुमारांना ‘आता भैरवी घ्या’ अशी चिट्ठी पाठवली. तेव्हा कुमारांनी भैरवी घेतली व ती मैफल संपवली. त्या दिवशी कुमार ३.५ तास गायले होते. आजारानंतर कुमार इतका वेळ कधीच गायले नव्हते. श्रोत्यांचे पुरेपूर समाधान झाले होते. सर्वजण त्या दिवशीच्या गाण्याने बेचैन होऊन पण आनंदाने परतले होते. या कार्यक्रमाचे उत्पन्न खर्चवेच जाता १८०० रु. आम्ही कुमारांना देऊ शकलो होतो.
आपल्याकडे शास्त्रीय संगीताच्या मैफली बहुतेक वेळा रात्रीच आयोजित केल्या जातात. त्यामुळे बऱ्याचदा लोकांना रात्रीचेच राग ऐकायला मिळतात. तेच राग लोकांच्या परिचयाचे होतात. वास्तविक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे सर्व काळाच्या रागदारीने समृद्ध आहे. निरनिराळ्या वेळेला जर अशा मैफली भरविल्या तरच सर्व काळचे राग लोकांना ऐकता येतील व सर्व रागांचे सौंदर्य अनुभवायला मिळेल. असे रागदारी गायन लोकांना कळण्यासाठी आम्ही श्री. कात्रे यांच्या क्लासमध्ये श्री. बी. आर. देवधर (कुमारांचे गुरु) यांची आठ व्याख्याने प्रात्यक्षिकासह दर शनिवारी व रविवारी निरनिराळ्या वेळांना आयोजित केली होती. त्या व्याख्यानांचा लाभ अनेक जाणत्या श्रोत्यांनी घेतला. ती आठ व्याख्याने अत्यंत उद्बोधक झाली. त्या त्या समयाचे राग त्यांच्यातील भेदासह श्री. देवधर यांनी सादर केले. त्या त्या रागातील निरनिराळ्या तालातील चिजा ते इतक्या उत्कृष्ट म्हणून दाखवीत असत की त्यांनी त्या संपूर्ण गायकीसह गाव्यात असे आम्हाला वाटे. पण वेळेअभावी त्यांना त्या चिजा थोडक्यातच संपवाव्या लागत. श्री. देवधरांसारखे सर्व घराण्यांच्या चिजा निवडून पारखून त्यांचा संग्रह करण्याचे काम कोणी केले असेल असे मला वाटत नाही. प्रत्येक चीज काही विशिष्ट कलाकृतीने भरलेली असे. त्या चिजा आम्हाला इतक्या थोड्या काळात ग्रहण करणे शक्य नव्हते. पण त्यांनी उमटवलेला ठसा मात्र प्रत्येकाच्या अंतःकरणात खास आहे. तोडी सुरु झाला की लगेच ‘पाहा, ही हुसेनी तोडी मधील चीज ऐका’, ‘ही लाचारी तोडी’, ‘ही बहादुरी तोडी’, ‘ही खटामधील बंदिश ऐका’; कानडा सुरु झाला की, ‘हा हुसेनी कानडा पाहा’, ‘नायकीतल्या त्या निरनिराळ्या तोंडावळ्याच्या चिजा पाहा’. श्री. मंगरुळकरांनी तर टिपणेच करुन घेतली. पण नुसत्या टिपणावरुन पुढे आम्हाला काहीच करता आले नाही. सारखे असे वाटे की हा सगळा अभ्यास व चिजा गळ्यावर चढवण्याला, या कलेला आपलं आयुष्यच वाहून घेतलं पाहिजे. देवधरांचे मुंबईतले विद्यालय म्हणजे सर्व घराण्यांच्या गायकवादकांची उतारपेठच होती. त्या सर्व वातावरणात कुमार वाढले. अगोदरच तीक्ष्ण बुद्धी आणि त्यात काय व कसे निवडायचे याबद्दल देवधरांनी दिलेली दिव्य दृष्टी यातूनच कुमार घडत गेले. आणि आज ते श्रेष्ठ स्थानी पोहोचले आहेत.
देवधरांच्या सर्व चिजांचा संग्रह ज्यांच्या पचनी पडला आहे अशा कुमारांचे निरनिराळ्या समयांचे रागगायन जर पुणेकरांना ऐकवता आले तर ती एक बहुमोल कामगिरी होईल या उद्देशाने श्री. अप्पासाहेब इनामदार यांनी ‘कलासंगम’ नावाच्या संस्थेमार्फत कुमारांचे काही सकाळचे व काही रात्रीचे असे जलसे ठरविले व ते सर्व हल्लीच्या भरत नाट्य थिएटरमध्ये लावण्यात आले. हे जलसे १९६५ साली सादर करण्यात आले. सकाळच्या जलशामध्ये त्यांनी सहेली तोडी, बिहड भैरव, मधसुरजा हे स्वरचित राग गायले तर रात्रीच्या जलशात लगनगांधार, माळवी ठुमरी, सोहनी भटियार, मालकंस हे राग म्हटले. मधून मधून निर्गुणी भजने किंवा रसिया वगैरे गाण्याचे प्रकारही त्यांनी लोकांना ऐकवले. ज्या चिजा ते मैफलीत गाणार होते त्या संपूर्ण शब्द, अर्थ आणि पार्श्वभूमीसह छापून घेऊन पुस्तिकेच्या रुपाने मैफलीच्या वेळी त्या पुस्तिका त्यांनी लोकांना विनामूल्य वाटल्या. ही बहुमोल कामगिरी दुसऱ्या कोणी आतापर्यंत केली नसेल. राग व चिजेतील शब्द यांचा समन्वय होऊन जनमनावर जो परिणाम होईल तो परिणाम नुसत्या स्वरांनी अगर केवळ चिजांच्या शब्दांनी होणार नाही ही त्यांची भूमिका त्यांनी श्रोत्यांना पटवून दिली आणि संगीत हे स्वरनिष्ठ असावे की शब्दनिष्ठ या वादाचा निर्णयच लावून टाकला असे म्हणायला हरकत नाही. कुमार गाताना स्वरांचे उच्चार कधीही बोबडे किंवा अर्धवट करीत नाहीत. जी चीज गायची असेल तिची बंदिश स्थायी-अंतऱ्यासकट स्वच्छ कळेल अशा रीतीनेच ते मांडत असत व हे त्यांच्या मैफलीचे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
या पुष्पात उल्लेख झालेले राग-बंदिशी यांच्या links –
१. राग भूप – ‘ध्यान अब दिज्यो’ – Link yet to be uploaded
२. राग कौशी – सुघर बर पायो
३. बिहागडा रागातील ‘सकल बन भेजी’ आणि ‘सखी मंदरवा में’ हे ध्वनिमुद्रण डॉ. वसंतराव देशपांडेंच्या स्मृती प्रीत्यर्थच्या कार्यक्रमातील असावे – कुमारजी सांगतात – ‘आज जे थोडं थोडं तुम्हाला ऐकवतो आहे ते वसंताला आवडत असे म्हणून ऐकवतोय.’
Another rendition of the Drut Bandish.