कुमारस्मृती पुष्प २

कात्रे यांच्या क्लासमध्ये झालेल्या मैफलीमधील बिहागमधील ‘डरिये वा’ हा रंगलेला ख्याल. त्यालाच जोड म्हणून ‘मैया घर जाने दे’ ही त्रितालमधील चीज, भीमपलास, काफीमधील तराणे, अडाण्यातील ‘हावे मैनू तूँसी’ या चीजा अविस्मरणीय झाल्या. बिदागी म्हणून अगदीच स्वल्प रक्कम आम्ही देत असू, पण कुमारांना ‘किती गाऊन दाखवू’ असे होई. आणि मग भैरवी संपल्यावरही निरनिराळ्या बंदिशी ते ऐकवीत असत. कुमारांच्या मैफलीव्यतिरिक्त सहवासातही गाण्याशिवाय इतर कोणताच विषय नसे. मला असं आठवतंय की, सकाळी मी कुमारांकडे गेलो असताना इझीचेअरवर पडल्या पडल्या मला त्यांनी तोडीच्या प्रकारांतील अनेक चीजा म्हणून दाखवल्या. “ही बहादुरीमधली बंदिश पाहा, ही बिलासखानीची चीज पाहा”… हाताने ताल देऊन लगेच सुरुवात. वाद्याची, ताल धरण्याची काही यातायातच नाही. आवाज हुकमी – नुसत्या इशाऱ्याने वाटेल तिथे फिरून येई. कुमारांना भेटून घरी येताना सारखे वाटे की आपण गाणे व्यर्थ शिकलो. पण घरी आल्यानंतर मला पुन्हा उत्साह येई व कुमारांच्या पद्धतीने गाण्याची मेहनत करण्याचा प्रयत्न करी. पण कुमारासारखा आवाज तयार केलेला नसल्यामुळे शेवटी नुसती आठवण करीतच मी बसून असे व पुन्हा केव्हा ते गाणे ऐकायला मिळेल याची मी वाट पाही.

गणपतराव कात्रे यांच्याकडे कुमार केव्हा येऊन उतरतील हे निश्चित सांगता येत नसे. पण ते आले की मला निरोप येई आणि मी वेळात वेळ काढून गाठ घेण्याचा प्रयत्न करी. कधी कधी नुसत्या गप्पांचाच कार्यक्रम होई. पण तोसुद्धा गाण्याला धरूनच. कुमारांच्या दर मुक्कामात गाणे होत नसे. कधी नुसतीच धावती भेट. पण त्या भेटीत असे काही वातावरण निर्माण होई की त्याची आठवण अनेक दिवस रहावी. एकदा संध्याकाळी मी सहज फडतरे वाड्यावरुन चाललो असता गणपतराव भेटले व म्हणाले ‘कुमार आला आहे. रात्री पथारी क्लासमध्येच आहे. रात्री गप्पा मारायला या.’ त्यावेळी कु. योगिनी जोगळेकर माझ्याकडे शिकायला येत होती. तिला कुमार आल्याचे मी सांगितले. ती म्हणाली, ‘मी येऊ का रात्री तुमच्याबरोबर कुमारांकडे’. मी कबूल केले. रात्री आम्ही गेलो तो कुमार बिछाना टाकून त्यावर बसून तंबोरा जुळवीत होते.

मला पाहिल्यावर म्हणाले, ‘आज काही तरी नवीन तुम्हाला ऐकवणार आहे’. कुमारांनी त्या दिवशी अनेक गझल म्हणून दाखवले. कदाचित रामूभैया दाते यांच्या सहवासात त्यांनी आत्मसात केले असावे. त्या दिवशी नुसते गझलच म्हणून दाखवले. ताल नाही, श्रोते नाही फक्त आम्ही तिघेच त्या आनंदात बुडून गेलो होतो. रात्रंदिवस संगीतात इतका बुडून गेलेला कलावंत मी पाहिला नाही. कुमारांच्या मनातले तंबोरे नेहमी जुळलेलेच असायचे. एकदा सहज गणपतरावांकडे मी संध्याकाळी डोकावले, तो त्यांच्या अंधाऱ्या खोलीच्या बिऱ्हाडात होल्डऑल बांधून त्यावर बसलेले कुमार मला दिसले. नुकतेच मुंबईहून संध्याकाळी ते आले होते व रात्रीच्या गाडीने बेळगावला निघणार होते. मी थोडा वेळ थांबलो. पान जमवण्याच्या पवित्र्यात कुमार होते. पानाच्या शिरा काढणे चालले आहे आणि तोंडाने मात्र ‘वाहवा! क्या बात है!’ हे उद्गार निघत आहेत.

मला कळेना की ही वाहवा कशाला आहे. माझ्या लक्षात आले की दुरून कोठून तरी रेडिओमधून बिस्मिल्लाची धून लागली आहे आणि त्यातील चांगल्या जागेला ही वाहवा जात होती. दररोजच्या व्यवहारात आमचे लक्षही या गोष्टीकडे नसते. गणपतराव कात्र्यांच्या त्या अंधाऱ्या खोलीत त्यांच्या मावशीच्या हातच्या ज्वारीची भाकरी व मेथीच्या भाजीलाही अशीच वाहवा देत असलेले कुमार मी पाहिले आहेत. कोणतीही गोष्ट रसिकतेच्या दृष्टिकोनातून पाहणे हे तर मुळी कुमारांच्या जीवनाचे मूळ सूत्र. याच सूत्रामुळे ते नेहमी ताजेतवाने असतात. दुर्मुखलेले किंवा चेहरा टाकून बसलेले मी कधीच पाहिले नाही.