कुमारस्मृती पुष्प १०

कुमारांचा आवाज बसल्यानंतरही काही उपचार करुन, पथ्य पाळून मैफल रंगवण्याचे त्यांचे कसब काही और आहे. आवाज बसल्यामुळे मैफल रहित करावी लागली असा फक्त एकच प्रसंग मला आठवतो. दोन वर्षांपूर्वी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये कुमारांनीच लावलेला कार्यक्रम त्यांचा आवाज बसल्यामुळे त्यांना रहित करावा लागला होता. थिएटरचे भाडे कुमारांना भरावे लागले. जाहिरातीचा खर्च फुकट गेला. जाण्यायेण्याचा प्रवासखर्च अंगावर पडला. मुंबईहून निघाल्यावर रेल्वे प्रवासातच त्यांचा आवाज बसला आणि तो इतका बसला की त्यांना बोलताही येईना. शेवटी थिएटरवर ‘कुमारांचा आवाज बसल्यामुळे आजचा कार्यक्रम रहित झाला आहे’ असा बोर्ड लावला. रात्री आम्ही सर्व कुमारांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या आवाजात थोडा फरक पडला होता व ते थोडे थोडे बोलू लागले होते. सकाळी परत ते मुंबईला गेले तोपर्यंत त्यांचा आवाज पूर्वीसारखा साफ झाला होता तो इतका की, मुंबईकरांना आवाज बसल्यामुळे कुमारांचा कार्यक्रम रहित करावा लागला हे मुळीच खरे वाटेना. पण या आपत्तीचेही कुमारांना काही वाटले नाही.

आवाज बसल्याचा दुसरा प्रसंग माझ्या आठवणीतील आहे – सुरेश हळदणकर यांच्या विद्यालयात कुमारांचे गाणे ठरले होते व त्यासाठी ते सौ. भानुमतीसह भटवाडीमधील ‘नारायण धाम’मध्ये अंजनीबाई मालपेकर यांच्याकडे उतरले होते. पुण्याहून मी, श्री.बाळासाहेब अत्रे, श्री. दत्तोपंत देशपांडे, श्री. घाटपांडे वगैरे मंडळी मुद्दाम गाणे ऐकण्यासाठी येथून सकाळच्या गाडीने निघालो. आधी कुमारांना भेटावे म्हणून या सर्व मंडळींसह मी ‘नारायण धाम’मध्ये गेलो. तेथे पाहतो तर सौ. भानुमती कुमारांचा गळा ऊन पाण्याने शेकत आहेत असे दिसले. कुमारांना बोलताही येत नव्हते. खुणांनी ते आमच्याशी बोलू लागले. आमच्या जेवणखाणाबद्दल चौकशी केली व सांगितले की संध्याकाळी हळदणकरच्या विद्यालयात गाण्याला या. उपचार चालू आहेत. आवाज ठीक होऊन जाईल. आम्हाला आश्चर्य वाटले. बोलता सुद्धा येत नाही अशा परिस्थितीत कुमार कसे काय गाणार? आम्ही जरासे नाखूष होऊन जिना उतरलो व दिवस समुद्रकिनाऱ्यावर, मत्स्यालयात व इतर ठिकाणी भटकत घालवला. संध्याकाळी गाण्याच्या ठिकाणी गेलो तर तेथे खूप तोबा गर्दी झाली होती व तिकिटे खलास झाली म्हणून आम्हाला सांगितले. आम्हाला दरवाजावर कोणीच आत सोडेना. शेवटी मी आमचा निरोप कुमारांना पोचता करा म्हणून सांगितले व चिठ्ठी आत पाठवली. कुमारांना चिठ्ठी मिळताच त्यांनी सर्वांना आत घेऊन या म्हणून सेक्रेटरीला सांगितले. पण ती ५-६ मंडळी आहेत तेव्हा कसे काय करायचे म्हणून सेक्रेटरी कुरकुरु लागला. तेव्हा कुमार रागावून त्यांना म्हणाले, ‘माझ्या बिदागीतून त्यांचे तिकिटाचे पैसे काढून घ्या पण त्यांना आधी आत घेऊन या.’ सेक्रेटरीचा नाइलाज झाला व त्यांनी आम्हाला आत नेऊन बसवले. कुमारांशी आमचा किती घनिष्ठ संबंध आहे याची सेक्रेटरीला कल्पना नव्हती. गाणे सुरु झाले. त्यादिवशी कुमारांनी ‘मालवती’ म्हटला.

मुंबईतील अर्क समजले जाणारे सर्व जाणकार श्रोते होते. त्यात मोहन पालेकर, देवधर इत्यादी मंडळी दिसत होती. कुमारांच्या आवाजाला त्रास होत आहे ही जाणीव आम्हाला होत होती. पण मालवतीच्या आलापामध्ये त्यांनी आवाजातील दोष हळूहळू नाहीसे केले व ‘चला रे चला जा’ हा त्यांचा मालवतीचा ख्याल सुरु केला. आवाज पूर्ववत काम देऊ लागला. बंदिश व्यवस्थित मांडल्यावर त्यातील जोरदार सट्ट्याच्या ताना अशा काही विलक्षण घेतल्या की सगळीकडून वाहवाची खैरात होत होती. द्रुत चिजेमध्ये तर कुमार अतिशय तयारीने गायले. आम्ही सर्व पुणेकर मंडळी एकमेकांकडे आश्चर्याने पाहत राहिलो. जवळजवळ १। तास ख्याल झाला. नंतर फर्माइश म्हणून ‘प्रेम केले काय हा झाला गुन्हा’ हे भावगीत कुमारांनी म्हटले. एकंदर मैफल त्यादिवशी आश्चर्यकारक रंगली. आवाज बसल्यानंतरही काही उपचारांनी मैफल रंगवण्याचे अलौकिक सामर्थ्य कुमारच दाखवू जाणे.

या पुष्पात उल्लेख झालेले राग-बंदिशी यांच्या links –

१. राग ‘मालवती’ खयाल – चलारे चला जा

Another Rendition 

२. राग मालवती द्रुत बंदिश – मंगल दिन आज

३. भावगीत – प्रेम केले काय हा झाला गुन्हा